डोंबिवली : ठाणे स्थानक टप्प्यात आल्याची चाहूल देणारा पारसिक बोगदा प्रवाशांच्या नजरेतून येत्या काही महिन्यात दूर होईल असे संकेत आता मिळू लागले आहेत. दिवा ते ठाणे पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मार्चअखेपर्यंत ही कामे पूर्ण करून नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून लोकल वाहतूक सुरू करण्याच्या जोरदार हालचाली मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू आहेत. ही मार्गिका पुर्ण होताच एक्सप्रेस आणि लोकल वाहतूक यांचा एकमेकांच्या मार्गिकेशी संबंध येणार नाही. त्यामुळे पारसिक बोगदा लोकल प्रवाशांना दूरावणारच आहे.
कुर्ला ते ठाणे आणि मुंब्रा ते दिवा या मार्गिकांची कामे यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहेत. मुंब्रा ते कळवादरम्यान असणारा पारसिकचा डोंगर, त्यालगतची खाडी असल्याने या भागात नव्या मार्गिकांची कामे करताना मोठे आव्हान होते. पारसिक बोगदा १०५ वर्षांची वारसा वास्तू असल्याने पुरातत्त्व विभागाने या बोगद्याच्या लगत नवीन बोगद्यासाठी खोदाई करण्यास रेल्वेला परवानगी दिली नाही.
मुंब्रा-कळवादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका टाकण्याचे काम सहा वर्षांपासून सुरू होते. डोंगर आणि खाडी यांचा मध्यिबदू साधत रेल्वेने नव्या मार्गिकांची कौशल्याने उभारणी केली आहे. मार्च अखेपर्यंत या मार्गिकांची सर्व कामे पूर्ण होऊन लवकरच या मार्गिकांवरून लोकल धावणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
पाचवी, सहावी नवी मार्गिका पहिली आणि दुसरी मार्गिका ओळखली जाईल. मुंब्रा रेल्वे स्थानकातील जुनी पहिली आणि दुसरी मार्गिका तिसरी आणि चौथी मार्गिका म्हणून उपयोगात आणली जाणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या धिम्या, सीएसएमटीकडून येणाऱ्या जलद लोकल या नव्या, जुन्या मार्गिकांवरून धावतील. पारसिक बोगद्यातील जुनी चौथी, पाचवी मार्गिका पाचवी, सहावी मार्गिका म्हणून ओळखली जाणार आहे. या मार्गिकांवरून फक्त मेल, एक्सप्रेस गाडय़ा धावतील. पारसिक बोगद्यातून धावणाऱ्या जलद लोकल मुंब्रा स्थानकातून धावतील. आणि पारसिक बोगदा हळूहळू प्रवाशांच्या नजरेतून दूर होईल.
रेल्वेकडून १९०६ मध्ये पारसिक बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. १९१६ मध्ये बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जलदगतीच्या दोन मार्गिका होत्या. प्रति तासाला ९० किमी वेगाने गाडी नेण्यास मुभा येथून होती. डोंबिवली ते ठाणे अंतर धिम्या मार्गावरून २१ तर जलद मार्गिकेवरून १४ मिनिटे लागत असत. मुंब्रा-ठाणेदरम्यान नव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच नवीन मार्गिका प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत.
– सुनील उदासी, जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ