ठाणे : कळवा येथील महात्मा फुलेनगर भागातील सहा महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे.
श्रीकांत चव्हाण या सहा महिन्यांच्या बाळाची हत्या झाली होती. त्याची आई शांताबाई चव्हाण (३०) हिनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले.
श्रीकांत याला शुक्रवारी वारंवार खोकला येत होता. त्यामुळे शांताबाई यांनी त्याला खोकल्याचे औषध पाजले. औषधाची मात्रा जास्त झाल्याने तो बेशुद्ध झाला. शांताबाई यांना त्याचा मृत्यू झाला असे वाटले. त्यामुळे घाबरलेल्या शांताबाई यांनी घराबाहेरील एका कोपऱ्यात त्याला ठेवले आणि त्याचे अपहरण झाल्याचा बनाव केला. शुक्रवारी रात्री ८.३० वाजता याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी पहाटे शांताबाई यांनी श्रीकांतला परिसरातील एका घराबाहेर असलेल्या पाण्याच्या पिंपात टाकले. त्यामुळे पिंपामधील पाण्यात बुडून श्रीकांतचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
चाळीतच मुलाचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी चाळीतील सुमारे १५ संशयितांची चौकशी सुरू केली होती. अखेर पोलिसांनी पुन्हा शांताबाई हिची सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली, असे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.