कल्याण : मुंब्रा ते कळवा दरम्यानच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेतर्फे रविवार, सोमवार दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली, ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. मेगाब्लॉकदरम्यान कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांमध्ये लोकल थांबणार नाहीत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील, परिसरातील प्रवाशांना तातडीने वाहतुकीचे साधन उपलब्ध व्हावे. या उद्देशातून हे नियोजन केले आहे. कोपर रेल्वे स्थानक डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ आहे. येथील प्रवासी पायी, रिक्षाने, खासगी वाहनाने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊ शकतात. त्यामुळे कोपर रेल्वे स्थानकाजवळ केडीएमटीची बस सोडण्यात आलेली नाही, असे केडीएमटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ठाकुर्ली रेल्वे स्थानक कल्याण आणि डोंबिवली स्थानकांच्या मध्यभागी आहे. या स्थानकातून इतरत्र जाण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनाशिवाय प्रवाशांना वाहतुकीचे दुसरे साधन नाही. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून डोंबिवली ते कल्याण दरम्यान १० बस सोडण्यात येणार आहेत. या बस डोंबिवलीहून सुटल्यानंतर घरडा सर्कल येथून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबा चौकातून ९० फुटी रस्त्याने पत्रीपूलमार्गे कल्याण येथे जाणार आहेत. अशाच पद्धतीने कल्याण येथून डोंबिवलीत येणाऱ्या विशेष बस ठाकुर्ली रेल्वे स्थानकमार्गे म्हसोबा चौकातून डोंबिवलीत येतील, असे केडीएमटीचे साहाय्यक परिवहन व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले. मेगाब्लॉक काळात प्रवाशांकडून वाढीव भाडे कोणी आकारू नये याची खबरदारी म्हणून वाहतूक पोलीस रिक्षा वाहनतळ परिसरात तैनात असणार आहेत. मध्य रेल्वेने मेगाब्लॉक काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष बससेवा सुरू करण्याची मागणी केडीएमटीकडे केली आहे
प्रवासी संख्या वाढली आणि १० बस कमी पडल्या तर वाढीव बस सोडण्याची तयारी केडीएमटीने केली आहे. रविवार, सोमवार सकाळ, संध्याकाळ केडीएमटीचे अधिकारी परिचलनासाठी डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण येथे तैनात असणार आहेत.
– डॉ. दीपक सावंत, व्यवस्थापक, केडीएमटी