ठाणे : ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रविवारी ठाणे ते कळवा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. रविवारी रेल्वे प्रशासनाने ठाणे खाडीवर बसविलेल्या दोन नव्या लोखंडी तुळईवरील रेल्वे रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर इंजिन चालविले. हा प्रयोगही यशस्वी झालेला आहे. त्यामुळे सोमवारपासून खाडीवरील नव्या रेल्वे रुळावरून धिम्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुरू होणार आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ठाणे आणि कळवा येथील तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या कामासाठी रेल्वेचे ८०० अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मेगाब्लॉक दरम्यान ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या आणि नव्या रुळांची जोडणी करण्यात आली. तसेच काही तांत्रिक दुरुस्ती केली गेली. ठाणे स्थानकापुढे उपनगरीय रेल्वेची वाहतूक ही ठाणे खाडीवरून कळव्याच्या दिशेने जाते. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने ठाणे खाडीवर जुन्या रेल्वे रुळांलगत दोन लोखंडी तुळई तयार करून नवी रेल्वे मार्गिका तयार केली होती. रविवारी रेल्वेने या लोखंडी तुळईवरील रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर दोन इंजिन चालविले. हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे सोमवारपासून या नव्या रेल्वे रुळावरून धिम्या मार्गिकेची वाहतूक सुरू होणार आहे.