वन विभागाची कसरत, बिबटय़ाकडून शिकार सुरूच
सागर नरेकर
बदलापूर: जुन्नर वनक्षेत्रातून कल्याणच्या वनक्षेत्रात आलेल्या बिबटय़ाला रेडिओ कॉलर लावल्याने त्याचा शोध घेणे सोपे होईल असा दावा वन विभागाचे अधिकारी करत होते. मात्र या यंत्रणेतील काही त्रुटींमुळे बिबटय़ा वन विभागासाठी संपर्क क्षेत्राबाहेरच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एखादी शिकार झाली किंवा कुणी बिबटय़ाला पाहिले त्या संदेशावरूनच बिबटय़ाचा वावर कोणत्या क्षेत्रात आहे हे कळते आहे. या बिबटय़ाची माहिती दर दोन तासांना मिळते असे सांगितले जात असले तरी स्थानिक वन अधिकाऱ्यांना अनेकदा दोन दोन दिवस या बिबटय़ाचा पत्ता लागत नाही, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बिबटय़ाला शोधताना वन विभागाची कसरत होते आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या जंगल क्षेत्रात फिरणारा बिबटय़ा वन विभागासाठी आव्हान निर्माण करणारा ठरला आहे. वन विभागाने या भागात तात्काळ नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहिम राबवली. या बिबटय़ाच्या गळय़ात जुन्नर वनक्षेत्रातून रेडिओ कॉलर लावण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा प्रवास पाहता येईल अशी आशा होती. मात्र या यंत्रणेतील काही त्रुटींमुळे बिबटय़ाचे नक्की ठिकाणी माहिती पडू शकत नसल्याने एखाद्या ठिकाणी जनावराची शिकार झाली किंवा कुण्या ग्रामस्थाने बिबटय़ाला पाहून तसा संदेश दिला त्यानंतरच त्याचा शोध वन विभागाला घ्यावा लागतो आहे.
याबाबत रेडिओ कॉलर विशेषज्ञ आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब यांना विचारले असता, रेडिओ कॉलर असलेल्या बिबटय़ाची माहिती दर दोन तासांनी मिळत असते असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मधल्या काळात बिबटय़ाचा प्रवास नक्की कुठे आणि कसा होतो याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्यातही या बिबटय़ाची माहिती स्थानिक वन विभागाला दर दोन तासांनी मिळत नाही. अनेकदा दोन दोन दिवस या बिबटय़ाच्या स्थानाबद्दल माहिती दिली जात नाही. त्यामुळे बिबटय़ाला कॉलर नाहीच असेच गृहीत धरून आम्ही बिबटय़ाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंत्रणा नेमकी काय? रेडिओ कॉलरमधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलरमध्ये असलेल्या बॅटरीची क्षमता अधिक काळ किंवा किमान एक वर्ष चालवावी लागते. त्यासाठी फक्त दर दोन तासांनी त्याचे स्थान मिळवले जाते. त्यासाठी प्रोग्रामिंग केली जाते. ही यंत्रणा भौगौलिक स्थानकनिश्चिती यंत्रणेपेक्षा अद्ययावत आहे. मात्र या दोन तासांतील त्याच्या प्रवासाचा थांगपत्ता लागत नाही.
बिबटय़ाचा मोकाट वावर
सुरुवातीला जंगल आणि नंतर मानवी वस्त्यांजवळ येणारा बिबटय़ा आता खुल्या रस्त्यांवर, नागरी वस्तीजवळ जाऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कल्याण मुरबाड राज्य मार्गावर रायते पुलाजवळ आणि अंबरनाथजवळच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तसेच आयुध निर्माण संस्थेत फेरफटका मारला आहे.
प्रतिक्रिया: सध्या तरी बिबटय़ाचे नेमके स्थान मिळू शकलेले नाही. मात्र ज्या जागी संशय वाटतो तिथे आम्ही ट्रॅप कॅमेरे लावतो आहे. आमच्या परिने जनजागृती करतो आहोत.
– तुळशीराम हिरवे, सहायक वनसंरक्षक, ठाणे