गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आपली पावले आता उल्हासनगर शहराकडे वळवली आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या सोंग्याची वाडी परिसरात नुकतेच बिबट्याचे दर्शन झाले. धक्कादायक म्हणजे या परिसरात पोहोचण्यासाठी बिबट्याने आयुध निर्माण वसाहतीतील नागरी वस्ती आणि २४ तास सुरू असणारा कल्याण बदलापूर राज्यमार्ग ओलांडला असण्याची शक्यता आहे. परतीच्या मार्गावरही त्याने अनेक नागरी अडथळे पार केल्याची शक्यता आहे. या बातमीने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जुन्नर वन क्षेत्रातून कल्याण आणि बदलापूरच्या वनपरिक्षेत्रात फिरणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून शहरांच्या वेशीवर येऊ लागला आहे. गेल्या आठवड्यात या बिबट्याने अंबरनाथ शहरातील आयुध निर्माण संस्थेच्या वसाहतीत फेरफटका मारला होता. त्यापूर्वी अंबरनाथ शहराच्या बदलापूर दिशेला असलेल्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातही बिबट्याने हजेरी लावली होती.
वनविभागाकडून बिबट्याच्या शोधाचा प्रयत्न सुरू असतानाच बिबट्याने आता अत्यंत दाटीवाटीच्या अशा उल्हासनगर शहरात दर्शन दिले आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेल्या सोंग्याची वाडी या परिसरात काही महिलांनी पहाटेच्या वेळी बिबट्याला पाहिल्याचे सांगितले आहे. वन विभागाकडे याची माहिती पोहोचताच त्यांनी तातडीने या परिसरात धाव घेऊन येथील जनतेला सावध राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एकूणच बिबट्याच्या संचाराच्या बातमीने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.