ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दलित आणि मुस्लीम विरोधी आहेत, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले. पण, त्यात कणा नसलेले हे पहिले आयुक्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यामुळे ठाण्यात प्रशासन विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दिवा येथील एमएमआरडीए योजनेच्या घर घोटाळय़ातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी मंत्री आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. त्यावेळी त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
एमएमआरडीए योजनेतील घर घोटाळय़ासारखे प्रकरण आयुक्त शर्मा यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पण, एका पक्षाची बाजू घेऊन महापालिका चालवू शकतो असे आयुक्तांना वाटत असेल तर मला स्वत:ला रस्त्यावर उतरून आम्ही काय आहोत हे दाखवून द्यावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. करोना काळ असल्यामुळे आतापर्यंत गप्प बसलो होतो. येत्या दोन ते चार दिवसांत खूप गोष्टी उघड करणार असून त्यात हे आयुक्त दलित आणि आणि मुस्लीम विरोधी कसे आहेत, हे उघड करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. हे आंदोलन शिवसेनेविरोधात नसून प्रशासनाविरोधात होते. या आयुक्तांच्या काळात बनावट ओळखपत्र तयार करण्यात येते. त्यासाठी ते जबाबदार नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी केला. आयुक्तांविरोधात बोलू शकत नाही, असे त्यांना वाटत असेल. पण, बक्षी यांच्यापासून ते राजीव यांच्यापर्यंत आयुक्त आम्ही बघितले असून त्यांच्याविरोधात टाकलेली लक्षवेधी आजही त्यांच्या लक्षात आहे. आयुक्त स्वत:ला राजे समजत असतील. परंतु ते लोकशाहीतील पगारी नोकर आहेत. नागरिकांच्या कराच्या पैशातून त्यांना पगार दिला जातो. नागरिकांची घरे गेली आणि त्याबाबत आयुक्तांना काहीच वाटत नाही. आयुक्त पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणि चौकशीची मागणी करण्यासाठी का गेले नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आमचे किंवा तुमचे कुणी असो चोर ते चोरच आहेत. पण पहिला चोर पकडण्याची हिमंत दाखवा. त्याचा विभाग तर बदलून दाखवा. एखाद्याची पोलीस चौकशी सुरू आहे आणि त्याच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, यामध्येच तुमची नैतिकता किती निर्मळ आहे हे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे मत आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे. त्यामुळे आघाडीबाबत मी निर्णय घेणार आहे. तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही.
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री