कल्याण : रेल्वेच्या जागेवरील झोपड्यांना रेल्वेने नोटिसा पाठवून जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत सुमारे पाच लाख झोपडीधारक बेघर होणार आहेत. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जागेत विविध भागातून आलेले रहिवासी राहत आहेत. या रहिवाशांना बेघर केले तर अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. या रहिवाशांचे पहिल्यांदा पुनर्वसन करण्यात यावे, असे मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी कल्याण पूर्वेतील आनंदवाडी भागातील झोपडीधारकांसमोर व्यक्त केले.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील लोकांना घराबाहेर काढायचे असेल तर लष्कराला बोलवावे लागेल. हे फक्त गरीब लोकांना घाबरविण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. कळवा येथील ३५ हजार झोपड्यांवर यापूर्वी अशीच कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी तीन तास रेल्वे सेवा रोखून धरली होती आणि केंद्राला निर्णय मागे घ्यावा लागला होता, याची आठवण आव्हाड यांनी करून दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी. महाराष्ट्रातील कायदा झोपड्यांना संरक्षण देऊ शकतो तर केंद्रालाही हीच भूमिका घ्यावी लागेल,असे आव्हाड म्हणाले.