कल्याण : मुरबाड तालुक्यातील धसई येथील एका बोगस डॉक्टरने परिसरातील रहिवाशांवर चुकीचे उपचार केल्याने मागील तीन ते चार दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या बोगस डॉक्टरविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रात्रीच अटक करण्यात आली आहे.
पांडुरंग घोलप असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. पांडुरंग हा शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीला होता. त्याने अनेक वर्षे मुरबाडजवळील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम केले. आरोग्य केंद्रात काम करण्याचा अनुभव असल्याने त्याला रुग्णांना कोणत्या आजारावर कोणती औषधे द्यायची याची तोंडओळख झाली होती. या अर्धवट ज्ञानाचा गैरफायदा घेऊन पांडुरंगने निवृत्त झाल्यानंतर धसईमधील आपल्या राहत्या घरात दवाखाना सुरू केला.
खासगी डॉक्टरांचे वैद्यकीय उपचार परवडत नसल्याने आदिवासी पाड्यांतील अनेक रहिवासी कमी खर्चात त्याच्याकडे उपचार घेत होते. पांडुरंगकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसली तरी त्याने रुग्णांवर घरच्या घरी उपचार सुरू केले होते. धसई आरोग्य केंद्रात मंगळवारी पाय दुखत असल्याने उपचारासाठी आलेल्या आशा बुधाजी नाईक (वय ३०, रा. चिखली) यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर गोरडे यांनी तपासले. त्यावेळी त्यांना खूप वेदना होत होत्या़ कंबरेच्या मागील बाजूस सुई देण्याच्या जागेवर सूज येऊन त्वचा निघाली होती. असाच प्रकार मिल्हे गावातील रामा भिवा आसवले, अलका रामा आसवले यांच्या बाबतीत घडला होता. या तिघांनी पांडुरंग घोलपकडे उपचार घेतले होते. चुकीचे औषधोपचार करण्यात आल्याने या तिघांचा मृत्यू झाला, अशी तक्रार करण्यात आली आहे. अशाच प्रकारचा उपचार घेऊन इतर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, असे तालुका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश वाघमोडे यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंगविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात यावा. त्याच्या निवृत्तिवेतनाचा शासनाने विचार करावा, अशी मागणी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा आरोग्य विभागाकडे केली आहे.
चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधिताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातील सर्व वैद्यकीय साहित्य, औषधे जप्त केली आहेत. – डॉ. भारती गोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुरबाड