कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक प्रभागाचा भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर शनिवारी रात्री उशिरा कल्याणच्या पोलिसांनी पोलीस महासंचालकांच्या आदेशावरुन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) कारवाई केली. तो सध्या आधारवाडी कारागृहात आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली.
सचिनवर खुनाचा प्रयत्नांतर्गत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन खेमा आणि त्याच्या साथीदारांनी कल्याण रेल्वे स्थानकाजवळील छत्री आणि पतंग विक्रीचे व्यापारी अमजद सय्यद यांच्याकडे रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली होती. असा प्रकार भूषण जाधव या व्यापाऱ्याबाबत करण्यात आला होता. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
व्यापारी अमजदने पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने सचिनच्या साथीदारांनी त्यांना रेल्वे स्थानक भागात पहाटेच्या वेळेत गाठून त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सचिनसह त्याचे साथीदार फरार झाले होते. पोलिसांनी सचिनला पाच दिवसांपूर्वी अटक केली. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची व साथीदारांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार पोलीस बळाचा वापर करून भाजपच्या नगरसेवकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत भाजपने गुन्हेगार पाश्र्वभूमीच्या नगरसेवकांच्या समर्थनार्थ खडकपाडा येथील अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी करोना साथीचे कारण देत मोर्चाला परवानगी नाकारून सुमारे एक हजार भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या. त्यामुळे भाजपने मोर्चा स्थगित केला. या प्रकरणात पोलिसांना डिवचल्याने सचिनचे मागील गुन्हे विचारात घेऊन महासंचालकांच्या आदेशावरून त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्याच्या हालचालींनी गती घेतली.