कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडील आणि मुलानेच घरातील १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केला असल्याचा प्रकार संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडील आणि मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे हा प्रकार उघडकीला येऊन वडील आणि मुलाविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील एक व्यवसाय करतात, तर मुलाचे लग्न झालेले आहे.
मुलीची आई काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील गावी गेलेली आहे. विवाहित मुलाची पत्नी देखील गावी गेलेली आहे. तेव्हापासून हे दोघे या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकाराने मुलगी त्रस्त होती. तिने हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला होता. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीला वडिलांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीने हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितला. त्यांनी मुलीला सोबत घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून वडील व मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.