ठाणे : निवडणुकांच्या डावपेचांमधील महत्त्वाचा भाग समजला जाणारा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या बालेकिल्ल्यांमध्ये किती प्रभाग वाढले, किती कमी झाले याशिवाय प्रभागांची झालेली मोडतोड, नवी रचना यासंबंधीचे सविस्तर चित्र यानिमित्ताने स्पष्ट होणार असून जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी तसेच डावपेचांना यानिमित्ताने सुरुवात होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू असून अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेतील नगरसेवकांची मुदतही कधीच संपली आहे. ठाणे महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत २५ फेब्रुवारी रोजी संपत असून उल्हासनगरातही याच काळात लोकप्रतिनीधींचा कार्यकाळ संपणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी आता सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा स्थानिक स्वराज्य संस्थांनी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने आता मान्यता दिली असून या प्रभाग रचनेला प्रारूप आराखडा मंगळवारी सादर केला जाणार आहे. बदललेल्या प्रभागांच्या सीमा कशा असतील याबाबत या सर्वच शहरांमधील राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.
किमान ३८ तर कमाल ५७ हजारांचा प्रभाग
पाच वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता. या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ हजार इतकी होती. त्यानुसार शहरात १३१ नगरसेवक संख्या निश्चित करण्यात आली होती. २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्यात आला असून लोकसंख्या जरी २०११ ची गृहीत धरली गेली असली तरी प्रभाग संख्या ११ ने वाढविण्यात आली आहे. यामुळे नगरसेवक संख्या १४२ इतकी होणार आहे. या निवडणुकीत तीन याप्रमाणे ४७ प्रभाग तयार करण्यात आले असून यापैकी ४४ क्रमांकाची सदस्यसंख्या चार अशी ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत किमान ३८ हजार ९०५ इतकी तर कमाल ५७ हजार ०६० इतकी मतदारसंख्या असलेले प्रभाग असणार आहेत.
डावपेचांना रंग
ठाणे महापालिका क्षेत्रात वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, मूळ शहर, कळवा, मुंब्रा, दिवा यांसारख्या भागांपैकी कोणत्या विभागात प्रभाग वाढणार तसेच कमी होणार याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता असून या रचनेवर पुढील डावपेचांना रंग चढणार आहे. कळवा, मुंब्रा या भागांत राष्ट्रवादीची भिस्त असून नौपाडा तसेच जुन्या शहरात शिवसेना आणि भाजप या जुन्या मित्र पक्षात कमालीची चुरस आहे. या भागातील प्रभागांच्या सीमा कशा असतील यावर बरीचशी राजकीय गणिते तयार होणार आहेत.