उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार उल्हासनगर शहरातील नगरसेवकांची संख्या आता ११ ने वाढून ८९ वर पोहोचली आहे. सध्या पालिकेत ७८ नगरसेवक आहेत. तर सध्या २० प्रभाग अस्तित्वात आहेत. नव्या रचनेनुसार शहरात ३० प्रभाग आकाराला येणार आहेत. त्यातील तीन सदस्यांचे २९ प्रभाग असणार आहेत तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. सिंधी आणि मागासवर्गीयांच्या मतांचे प्राबल्य असलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात ६ प्रभाग वाढले आहेत. तर अंबरनाथ आणि कल्यमण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात ४ प्रभागांची वाढ झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत ४ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. मंगळवारी उल्हासनगर महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. यापूर्वी उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ सदस्य होते. तर शहरातील प्रभागांची संख्या २० होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबिली गेली होती. मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर सध्या उल्हासनगरात तीन सदस्यीय प्रभाग पद्धत राबवली जाते आहे. त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील निवडणूक विभागाकडून केले जात होते. नव्या रचनेनुसार आता महापालिकेत नगरसेवकांची संख्या ८९ वर पोहोचणार आहे. तर प्रभागांची संख्या ही ३० वर पोहोचणार आहे. यातील २९ प्रभाग हे तीन सदस्यांच्या असतील तर एक प्रभाग दोन सदस्यांचा असेल. प्रभाग क्रमांक १६ हा दोन सदस्यांचा असणार आहे. एकूण मतदारांची संख्या ५ लाख ६ हजार ९८ इतकी असून त्यात ८६ हजार अनुसूचित जातीची तर ६ हजार ५७६ अनुसूचित जमातीची संख्या आहे. मंगळवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर या रचनेवर सूचना आणि हरकती नोंदविण्याचे आवाहन उल्हासनगरचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. त्यासाठी १ ते १४ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सूचना आणि हरकती पालिका मुख्यालयात तसेच प्रभाग कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी प्रभाग रचना अशी
उल्हासनगर महापालिका क्षेत्र तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले आहे. यात उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र येथे सिंधी नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य नगरसेवकांची संख्या अधिक आहे. या विधानसभा क्षेत्रात पूर्वी १२ प्रभाग अस्तित्वात होते. तर नव्या प्रभाग रचनेत या क्षेत्रात आता १८ प्रभाग असणार आहेत. यात ५३ नगरसेवक असणार आहेत. या भागात भाजप, साई पक्ष आणि टीम ओमी कलानी यांचे वर्चस्व आहे. तर कल्याण पूर्व आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात यापूर्वी ८ प्रभाग होते. त्यांची संख्या आता १२ वर गेली आहे. त्यामुळे येथील नगरसेवक संख्या ३६ वर पोहोचली आहे. हा भाग मराठीबहुल मतदारांचा म्हणून ओळखला जातो. येथे शिवसेनेचा वरचष्मा असून भाजप, राष्ट्रवादीचेही नगरसेवक आहेत.