गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे. पहाटे असणारी कडाक्याची थंडी आणि धुक्याची चादर असं चित्र अनेक ठिकाणी दिसून येतं. मात्र या थंडी आणि धुक्याचा फटका आता मध्य रेल्वेला बसलाय. आज म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी धुक्यामुळे मध्य रेल्वेवेरील लोकल गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीराने होतेय. कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीवर धुक्याचा परिणाम झालाय.
समोर आलेल्या माहितीनुसार वांगणी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आज पहाटेपासूनच दाट धुकं असल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय. दुष्यमानता कमी असल्याने लोकल ट्रेन्स उशीराने धावत आहेत. यामुळेच आज धुक्यानेच लोकल ट्रेनची वाट अडवल्याचं चित्र दिसत आहे. सामान्यपणे पावसामुळे ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसल्याचं मुंबईकरांना सवयीचं झालं असलं तरी अशाप्रकारे धुक्यामुळे ट्रेन तब्बल २० ते २५ मिनिटं उशीरा धावत असल्याचं क्वचितच पहायला मिळतं.
थंडी आणि उन्हाचा खेळ…मागील काही दिवसांपासून सकाळचं तापमान १० अंशांपर्यंत असतं तर दुपारचे तापमान मात्र ३३ अंश सेल्सियसपर्यंत वाढल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके असा अनुभव येतो आहे. कोरडी हवा आणि स्वच्छ आकाश यामुळे सूर्यास्तानंतर झपाटय़ाने तापमान घसरते आहे. तर सूर्योदयानंतर पटकन पारा चढत असल्याचे निरीक्षण खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी नोंदवले आहे. सकाळ आणि दुपारच्या तापमानातील हा फरक २० ते २४ अंश सेल्सियस इतका प्रचंड आहे.
बदलापूर ८.९ अंशांवर…गेल्या आठवडय़ात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. बदलापुरातील तापमान ८.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होते. गेले काही दिवस तापमान ९ ते १२ अंश सेल्सियस दरम्यान आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात गारठा जाणवत होता. जिल्ह्यातही अशाच प्रकारे तापमानात घट पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास गारठा जाणवतो, मात्र दुपारच्या तापमानात वाढ झाल्याचे चित्र आहे. हवेत आद्र्रता कमी असल्याने तापमानात घट होण्यात मदत होते. बदलापूर हे कोकणाच्या घाट पायथ्याजवळ असल्याने जास्त घट होते आहे, असे मोडक म्हणाले.