ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या दिरंगाईचा फटका
मुंबई : ठाणे आणि दिवा दरम्यानची ९.४० किलोमीटर लांबीची पाचवी आणि सहावी मार्गिका सेवेत दाखल होण्यास तब्बल १२ वर्षांहून अधिक कालावधी लागला असून विविध कारणांमुळे रखडलेल्या या मार्गिकेवरील खर्च तब्बल ४८४ कोटी रुपयांनी वाढला आहे.
ठाणे-दिवा या पट्ट्यात स्वतंत्र मार्गिका नसल्यामुळे मेल, एक्स्प्रेस आणि लोकलगाड्या केवळ दोन जलद मार्गिकेवरूनच धावत होत्या. त्यामुळे लोकलबरोबरच मेल एक्सप्रेसचेही वेळापत्रक विस्कळीत होत होते. दिव्याजवळ लोकल गाड्यांना मार्ग देण्यासाठी मेल, एक्सप्रेस गाड्या थांबविण्यात येत होत्या. प्रवाशांचे होणारे हाल आणि बिघडणारे वेळापत्रक सुरळीत करता यावे यासाठी ठाणे आणि दिव्यादरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गिका उभारण्याचे काम एमआरव्हीसीकडे (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) सोपविण्यात आले. या प्रकल्पासाठी २००८-०९ मध्ये १३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र मार्गिका बनवताना आलेल्या अडथळ्यांमुळे एप्रिल २०१९ मध्ये या रकमेत मोठी वाढ झाली. या मार्गिकेचा खर्च ५०२ कोटी रुपयांवर पोहोचला.
ठाणे-दिवा मार्गिकेतील कळवा, मुंब्रा दरम्यानचे मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण हटविण्यासाठी लागलेला कालावधी, काही लोकप्रतिनिधी व स्थानिकांनी केलेला विरोध, तसेच मुंब्रा येथे जागा उपलब्ध नसलेल्याने या मार्गिकेसाठी उभारावा लागलेला एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा उड्डाणपूल, अन्य परवानग्या मिळवण्यासाठी लागलेला कालावधी यामुळे प्रकल्पाला बराच विलंब झाला. प्रकल्पासाठी २०१९ मध्ये नवीन खर्च आखलेला असतानाच त्यात पुन्हा वाढ झाली आणि आणखी १०८ कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे एकूण प्रकल्प खर्च ६१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केवळ ५०० चौरस मीटर खासगी जमीन
ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी १२ हजार ८५२ चौरस मीटर सरकारी जमीन आणि ५०० चौरस मीटर खासगी जमीन संपादित करण्यात आली.
ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या या मार्गिकेदरम्यान जमिनी असलेल्या स्थानिकांना योग्य मोबदला देण्यात आला. तसेच ४६९ जणांचे पुनर्वसन करण्यात आले.