कल्याण : जमीन लाटण्यासाठी शेतकरी कुटुंबियांवरील हल्ला प्रकरणी अखेर 36 तासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रें(Ramesh Mhatre)सह 15 जणांविरोधात डायघर पोलीस ठाण्या(Daighar Police Station)त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे पीडित कुटुंबासोबत 6 तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. पीडित कुटुंबियांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दहिसर मोकाशी पाडा या गावात दोन दिवसापूर्वी एका शेतकरी कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. केडीएमसीचे माजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबियांनी केला होता.
जबरदस्तीने जमिन घेण्यासाठी रमेश म्हात्रे दबाव आणत आहेत आणि त्यासाठी मारहाण केली असल्याचा आरोप शेतकरी एकनाथ मोकाशी यांनी केला होता. या हल्ल्यात त्यांचासोबत त्यांचा मुलगा देखील जखमी झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याप्रकरणी शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेतकरी कुटुंबीयांसोबत जवळपास 6 तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. यावेळी मनसे आमदार यांनी पोलीस गुन्हा दाखल करत नाही तर पीडित कुटुंब न्यायालयात धाव घेणार असे सांगितले होते. अखेर 4 दिवसानंतर का होईना डायघर पोलिसांनी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकरी एकनाथ मोकाशींलह पोलीस ठाण्यात भेट दिली. कुटुंबियांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना धन्यवाद देत पोलिसांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे. मात्र शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण चर्चेला उधाण आले आहे.