कल्याण: कल्याण (kalyan) तालुक्यातील आदिवासी पाड्यात (adivasi) दगडखाणीमध्ये दगडफेक करणाऱ्या तीन जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ आदिवासींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच ही अटक बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस आपलं ऐकत नसल्याचं पाहून आदिवासींनी आम्हाला पण अटक करा अशी मागणी करत पोलीस स्टेशनच्या आवारात पारंपारिक आदिवासी नृत्य सुरु केले. महिला आदिवासींनी फेर धरून नृत्य केलं. गाणी गात आणि घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं. हे पाहून पोलिस (police) सुद्धा हैराण झाले. पोलिसांनी या आदिवासींना नृत्य थांबविण्यास सांगितले. पण आदिवासींनी त्यास नकार दिला आणि आपलं निषेध आंदोलन सुरूच ठेवलं. आदिवासींचं हे अनोखं आंदोलन पाहून पोलीस स्टेशनच्या बाहेर बघ्यांनी गर्दी केली होती. आदिवासींच्या या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच मीडियानेही या ठिकाणी गर्दी केली होती.
कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात मोठ्या दगडखाणी आहेत. स्थानिक आदिवासी या दगडखाणीला अनेक वर्षापासून विरोध करत आहेत. वारंवार दगड खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे त्यांची जीवन धोक्यात आले आहे, असं या स्थानिक आदिवासींनी म्हटलं आहे. याबाबत आदिवासींनी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार करुन माहिती दिली आहे. काही दिवसापूर्वी कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी हे मान्य केले होते. या ठिकाणी हे आदिवासी शंभर वर्षापासून राहतात. त्याठिकाणी पाहणी करुन प्रांत अधिकाऱ्याने समस्या सोडविणार असल्याचे सांगितले होते.
या दगडखाणींना सरकारकडून परवानगी आहे. यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे हे विचाराधीन आहे. या दरम्यान दगडखाणीत दगडफेक करणाऱ्या आरोपाखाली तीन आदिवासी तरुणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात सगळीच आदिवासी कुटुंबांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आमच्या तीन जणांना अटक केली असेल तर आम्हाला सुद्धा अटक करा, अशी मागणी करत पोलीस ठाण्याच्या आवारात आदिवासी पारंपारिक नृत्य करत आंदोलन सुरु केले आहे. घोषणा देत आणि गाणी गात हे आंदोलन केलं. यावेळी महिला आणि लहानमुले पोलीस ठाण्याबाहेर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आमची कारवाई योग्य आहे. दगडफेक प्रकरणी तिघांना अटक केली आहे. आदिवासी बांधवांची जी काही मागणी आाहे. त्यांनी महसूल खाते किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन समस्या सोडवून घ्यावी, असं टिटवाळा पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. सध्या सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांची पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.