डोंबिवली : डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोंबिवलीत एका महिलेचा मृतदेह चक्क सोफासेटमध्ये (Dead body in sofa set) आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीच्या दावडी येथील शिवशक्ती नगर (Shivshakti Nagar in Dawadi, Dombiwali) परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून तिची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या महिलेच्या मृत्यूमागे नेमका कुणाचा हात आहे, याचं गूढ उकलण्याचं सध्या पोलिसांसमोर आव्हान (Police investigation) उभं ठाकलंय. सुप्रिया घरी एकटी असताना तिच्यासोबत हा प्रकार घडलाय. याप्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीनं तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासातून या महिलेची हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलंय.
डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. पत्नी घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून आली नाही. मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली होती. तरी कुठे गेली आहे हे समजून आले नाही.
याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात पोहचले होते. रात्र झाली होती. घरात दररोज येणा:या शेजा:यांना सोफा विचित्र अवस्थेत दिसून आला. त्यांनी तो सोफा चाचपला. सोफ तपासून पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. कारण सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
सीनिअर पीआय शेखर बागडे, पोलिस निरिक्षक अनिल पडवळ आणि पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. अखेर तिची हत्या कोणी व कशा करीता केली. तिच्यासोबत काही गैर प्रकार झाला आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून विचारपूस सुरु आहे
दरम्यान दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत एक सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करत एकाला अटक केली होती. शरीस संबंधास नकार दिल्यानं एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह हा सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 27 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.