अंबरनाथ : जन्मदात्यांनी बेकायदेशीरपणे आपलं बाळ दत्तक (Adoption) दिल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाळाच्या आई-वडिलांसह मूल दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने फक्त स्टॅम्प पेपरवर अॅग्रिमेंट (Stamp Paper Agreement) करुन बाळ दत्तक घेतल्याचं समोर आलं आहे. तिसरी मुलगी झाल्याने आणि तिच्या संगोपनाचा खर्च परवडणार नसल्याने बाळाच्या आई-वडिलांनी त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये (Ambernath Thane) राहणाऱ्या बाळाच्या माता-पित्याने नालासोपाऱ्यातील ओळखीच्या दाम्पत्याला आपलं लेकरु दत्तक दिलं होतं.
अंबरनाथच्या शिवनागर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याला तीन महिन्यांपूर्वी तिसरी मुलगी झाली होती. मात्र या दाम्पत्याची तिसऱ्या मुलीचं संगोपन करण्याची परिस्थिती नव्हती, म्हणून त्यांनी आपलं पोटचं बाळ नालासोपाऱ्यात राहणाऱ्या त्यांच्या ओळखीतीलच एका दाम्पत्याला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार या दोन्ही दाम्पत्यांनी परस्पर सहमतीने स्टॅम्प पेपरवर अॅग्रिमेंट करुन हे बाळ दत्तक घेतलं. मात्र बाळ दत्तक घेण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी केली नव्हती.
याबाबतची माहिती ठाण्याच्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती देत या दोन्ही दाम्पत्यावर अल्पवयीन न्याय (मुलाची काळजी आणि संरक्षण) कायदा 2015 च्या कलम 80 प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर बाळाला एका आश्रमात ठेवण्यात आलं असून या दोन्ही दाम्पत्याची चौकशी सुरु असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.
या दत्तक प्रक्रियेत बाळाची खरेदी विक्री झालेली नसून फक्त कायदेशीर प्रक्रिया न केल्यामुळे या दोन्ही दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी फोनवरून दिली आहे.