कल्याण: एका पळवून आणलेल्या मुलीवरून दोन मित्रांमध्ये जोरदार भांडण झालं. भांडणाचं पर्यावसान हाणामारीत झालं. त्यामुळे संतप्त झालेल्या मित्राने दुसऱ्या मित्राचा काटाच काढला. धारदार शस्त्राने सपासप वार करत एका मित्राने दुसऱ्या मित्राचा काटा काढला. अरमान सय्यद असं या मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी (khadak pada police) अवघ्या पाच तासातच शाहरुख शेख (shahrukh shaikh) या तरुणाला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे चोरीची गाडी लपवण्यासाठी मयत तरुण आरोपीसोबत बंदरपाडा येथे आला होता. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली आणि शाहरुखने धारदार शस्त्रांनी जीवलग मित्रावरच वार करून त्याचा कायमचा काटा काढला. या घटनेमुळे कल्याणमध्ये (kalyan) एकच खळबळ उडाली आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा परिसरात शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जीने यांच्या पथकने तरुण कोण आहे आणि त्याची कोणी हत्या केली आहे याचा तपास सुरू केला. घटना स्थळी सापडलेल्या दोन मोबाईलच्या आधारे पोलिसांनी पाच तासाच्या आत या हत्येचा उलगडा केला.
कल्याणच्या बल्यानी परिसरात 16 वर्षीय अरमान सय्यद हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. याच परिसरात शाहरुख शेख या देखील राहत होता. शाहरुख मोबाईल रिपेअरिंगचे काम करत होता. इमरान व शाहरुख चांगले मित्र होते. काही दिवसापूर्वी शाहरुखच्या मित्राने भिवंडी येथून एक मुलगी पळवून आणली. ही मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने शाहरुखनेच ही मुलगी लपवल्याचा अरमान आणि त्याच्या मित्रांना संशय आला. अरमानने शाहरुखला त्या मुलीबाबत विचारणा केली. कसून चौकशी केल्यानंतरही शाहरुख काहीच सांगत नसल्याने अरमान आणि शाहरुखमध्ये कडाक्याचे भांडण झालं. यावेळी अरमानने शाहरुखला बेदम मारहाण केली. त्यामुळे शाहरुख मनातून चवताळला होता. पण त्यावेळी तो गप्प बसला.
मात्र त्याच्या डोक्यात अरमान बद्दल राग होता. त्याने आपला राग व्यक्त केला नाही. तो संधीच्या प्रतिक्षेत होता. गुरुवारी अरमानने एक चोरीची गाडी लपवण्यासाठी शाहरुखला बोलवलं. शाहरुखला ही आयतीच संधी मिळाली. सोबत जाताना त्याने धारदार शस्त्रं घेतलं. कल्याण पश्चिमेतील बंदार पाडा येथे पोचल्यावर दोघांममध्ये भांडण झाले. त्यामुळे संतप्त शाहरुखने अरमानवर शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात अरमानचा जागीच मृत्यू झाला. अरमान रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचं पाहून शाहरुखने तिथून पळ काढला. आरोपीने पळ काढला असला तरी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अवघ्या पाच तासात त्याला जेरबंद करण्यात आलं, असं एसीपी उमेश माने यांनी सांगितलं.