विरार : ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना मुंबईजवळच्या विरारमध्ये (Virar) पाहायला मिळाली आहे. दोन वर्षांच्या मुलाच्या अंगावरुन कार (Car) गेली, मात्र सुदैवाने चिमुरड्याला कुठलीही दुखापत झाली नाही. गाडी गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने हा लहान मुलगा चालत बाहेर आला. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील गार्डनर एव्हेन्यू या सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. कारखालून बाहेर पडणारा मुलगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे. 23 फेब्रुवारी रोजीची ही घटना आहे. चिमुरडा या घटनेतून बालंबाल बचावला असला तरी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेजबाबदार कार चालक मनोज यादव आणि कारमध्ये बसलेल्या नैना सावंत यांच्या विरोधात बर्डे कुटुंबीयांनी भारतीय दंड कलम 279, 337 आणि मोटरवाहन अधिनियम 187 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील गार्डनर एव्हेन्यू या सोसायटीमध्ये दोन वर्षांच्या मुलाच्या अंगावर कार जाऊन सुद्धा मुलगा कारच्या खालून सुखरुप बाहेर पडला.
गार्डन आव्हेन्यू या सोसायटीतील उमा बर्डे यांच्या घरी त्यांचा मुलगा तेजस, सून रसिका आणि दोन वर्षांचा नातू तस्मय राहायला आले होते. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आजी उमा बर्डे आपला दोन वर्षाचा नातू तस्मय याला बिल्डिंगच्या आवारात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या.
तस्मय खेळत असताना बिल्डिंगमध्ये आलेल्या अर्टिगा कारने हॉर्न न वाजवता तस्मयला जोराची धडक दिल्याचा आरोप केला जात आहे. चिमुरडा तस्मय कारच्या चाकाखाली येऊन गाडीच्या मधोमध आला. मात्र गाडीच्या मागून लगेच बाहेर पडला. यात तस्मय किरकोळ जखमी झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेजबाबदार कार चालक मनोज यादव आणि कारमध्ये बसलेल्या नैना सावंत यांच्या विरोधात बर्डे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय दंड कलम 279, 337 आणि मोटरवाहन अधिनियम 187 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.