ठाणे : ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात पब्जी खेळा (Pubji Game)त वारंवार जिंकण्यावरून झालेला वाद हा एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. याच वादातून चाकूने वार करुन एका तरुणाची हत्या (Youth Murder) करण्यात आली आहे. साहिल जाधव (21) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन आहेत. प्रणव प्रभाकर माळी असे मुख्य आरोपीचे नाव आहे. मयत तरुण आणि आरोपींमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून वाद सुरु होते.
मयत साहिल जाधव हा पब्जी खेळण्यात तरबेज होता. याच कारणामुळे आरोपींच्या मनात त्याच्याबद्दल द्वेषभावना होती. याआधीही आरोपी आणि साहिलमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी साहिलने वर्तकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रारही दाखल केली होती. मुख्य आरोपी प्रणव माळी आणि त्याचे दोन साथीदार संगनमताने नेहमी साहिलला पब्जी गेममध्ये किल करायचे. मात्र आता तर आरोपींनी साहिलला प्रत्यक्षच किल केले. आरोपींनी साहिल राहत असलेल्या जानकीबाई चाळीजवळ त्याला गाठले आणि त्याच्यावर सपासप चाकूने वार करीत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात साहिलच्या छातीत, पाठीत, डोक्यावर, गुडघ्यावर गंभीर वार करण्यात आले. यात साहिलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपीला 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तर अन्य दोन अल्पवयीन आरोपींना भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली. तसेच पालकांनी इंटरनेटच्या माध्यमातून जे खेळ सुरू आहे, त्यावर आळा घालण्यासाठी देखील आव्हान केले आहे.