कल्याण: कल्याण पश्चिमेकडील (Kalyan) गौरी पाडा (Gauripada lake) येथील तलावात तब्बल 80 हून अधिक कासवांचा (turtles) मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली होती. या कासवांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वनविभागाने मृत कासव शवविच्छेदनासाठी पाठवले होते. या कासवांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या मृत कासवांच्या व्हिसेरा तपासणीत या कासवाचा मृत्यू त्यांच्या पोटात घातक बॅक्टेरिया गेल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वन विभागाचे कल्याण वनसंरक्षक आर एन चन्ने यांना अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत केडीएमसीला पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. या तलावातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तत्काळ पाऊल उचलण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कासवांचा मृत्यू झाल्याने कासवांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत.
कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या गौरीपाडा तलावात 22 जानेवारी रोजी काही कासव मृतावस्थेत आढळले होते. या तलावात लागोपाठ दोन दिवसात तब्बल 80 कासव मृतावस्थेत आढळल्याने या कासवांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. प्राणीमित्र संघटना व वन विभागाने तत्काळ धाव घेत मृत कासव तपासणीसाठी ताब्यात घेतले. या कासवांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. यानंतर कासव कशामुळे दगावले? याची तपासणी करण्यात आली. अखेर या व्हिसेरा तपासणीचा अहवाल वन विभागाकडे प्राप्त झाला असून या अहवालात कासवांचा मृत्यू घातक विषाणू पोटात गेल्यानेच झाल्याचे निदान नोंदवण्यात आले आहे.
दरम्यान पालिका प्रशासनाने या पाण्यात कोणताही घातक पदार्थ नसल्याचे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वॉर या संस्थेचे प्रेम आहेर यांनी दूषित पाण्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनने होण्याची शक्यता वर्तवली आहे. कासवाच्या संवर्धनासाठी सरंक्षनासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत केडीएमसी आणि वनविभागाला सूचना करण्यात येणार असल्याचे सांगितले.