भिवंडी : भिवंडी शहरातील 72 गाळा वसई रोड या परिसरात पहाटेच्या सुमारास 84 ग्रॅम एमडी पावडर (MD Powder), गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसांसह दोघांच्या भोईवाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हरिष राकेश सिंग (30), आफताब अन्वर शेख (35) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. यापैकी हरिष राकेश सिंग याच्यावर 19 गुन्हे दाखल असून त्यापैकी 6 गुन्ह्यात तो फरार आहे. यामध्ये ज्वेलर्स दुकानदारावर गोळीबार करून दरोडा, पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार करून पलायन करणे, दरोडे, जबरी चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांना गुप्त बागमीदारामार्फत 72 गाळा या परिसरात दोघे जण एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिसरात सापळा रचून या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ 4 लाख 20 हजार रुपये किमतीची 84 ग्रॅम एमडी पावडर, 25 हजार रुपयांचा एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे,1 लाख 35 हजार किमतीची 27.690 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व 2 लाख किमतीची केटीएम बाईक असा एकूण 7 लाख 81 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी ही माहिती दिली असून कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
साताऱ्यातील वडूज,औंध, उंब्रज, दहिवडी या ठिकाणी धाडसी दरोडे टाकून मारहाण करत जबरी लुटमार करणारी 5 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि बीड जिल्ह्यातील आष्टी येथून ही टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी वडूज, पुसेसावळी, मसूर येथील दरोड्याच्या गुन्ह्यांसह वडूज आणि दहिवडी येथील प्रत्येकी 1 घरफोडी अशा 5 गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.