ठाणे : ठाण्यात वाहतूक पोलिसावर (Thane Traffic Police) माथेफिरुने हल्ला (Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कापूरबावडी वाहतूक पोलीस विभागातील एका पोलिसावर नाकाबंदी दरम्यान हल्ला करण्यात आला. कापूरबावडी ब्रिजखाली ड्रिंक अँड ड्राईव्हची (Drink and Drive) कारवाई सुरु होती. कारवाईचा राग आल्याने वाहतूक विभागाचे पोलीस नागनाथ कांदे यांच्यावर दोघा तरुणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी अनिल गुप्ता याने पोलिसाच्या डोक्यात वीट मारली. या प्रकरणी राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल गुप्ता आणि भगीरथ चव्हाण अशी आरोपींची नावं आहेत.
होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्त ठाणे शहर वाहतूक विभागाची मद्यपी वाहन चालकांवर दिवसभर कारवाईची विविध ठिकाणी मोहीम सुरु होती. ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याचा राग मनात धरुन काही वेळाने कारवाई संपल्यानंतर आरोपींनी मागच्या बाजूने पोलिसाच्या डोक्यात वीट मारली.
कारवाई दरम्यान दोन्ही आरोपींनी मद्य प्राशन केल्याचे आढळले होते. त्यामुळे मुख्य आरोपी अनिल गुप्ता याच्यावर कलम 185 नुसार, तर सहआरोपी भगीरथ चव्हाण याच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात आली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर होण्याचे पोलीसांनी आदेश दिले होते. मात्र केलेल्या कारवाईचा राग मनात धरुन वाहतूक पोलिसावर हल्ला करण्यात आला
झालेल्या संपूर्ण प्रकारानंतर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहतूक पोलीस हवालदार यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.