ठाणे :अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कुलदीप निकम या भोंदूबाबाच्या यू-टय़ूब वाहिनीवर अडीच लाखांहून अधिक सदस्य (सबस्क्राईबर) असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भूतबाधा उतरविणे, जादूटोणा करण्याच्या नावाने त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. त्याच्याकडून चित्रफीत तयार करण्यासाठी लागणारे ३२ कॅमेरे, महागडे लॅपटॉप, मोबाइल, ड्रोन कॅमेरे, भूत शोध यंत्र, प्राण्यांचे दात, सापाची कात तसेच तंत्रविद्येची पुस्तके पोलिसांनी जप्त केली आहेत.
घोडबंदर येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुलदीप निकम या भोंदूबाबाने साथीदार किशोर नवले आणि स्नेहा शिंदे यांच्या मदतीने अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू करून तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, पैसे कमवण्यासाठी तसेच नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्यांनी दत्तप्रबोधिनी पब्लिकेशन व पॅरानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी या नावाने यू-टय़ूब वाहिन्या सुरू केल्याचेही तपासात समोर आले. यातील दत्तप्रबोधिनी पब्लिकेशन या वाहिनीवर १ लाख १६ हजारहून अधिक जण सदस्य आहेत. तर पॅरानॉर्मल रेस्कुअर सोसायटी या वाहिनीवर १ लाख ६४ हजार सदस्य आहेत. या वाहिन्यांच्या माध्यमातून जादूटोणा करणे, भूतबाधा उतरविणे अशा विविध विषयांवर चित्रफिती प्रसारित केल्या आहेत. काही सदस्य या चित्रफिती पाहून अनेक जण त्यांच्या समस्या कुलदीपकडे सांगत असल्याचे चित्रफितीमधील प्रतिक्रियेवरून समजते.
तक्रार दाखल करण्याचे पोलिसांचे आवाहन
कुलदीपची चौकशी केली असता, समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाकडून तो पहिल्या भेटीसाठी ३० हजार रुपये उकळत होता. त्यानंतर त्या व्यक्तीस इतर विधीचे कारण देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये घेत होता. त्यामुळे या माध्यमातून हजारो नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांना असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी या आरोपींच्या घरी झडती घेतली असता, चित्रफिती तयार करण्यासाठी लागणारे ३२ अत्याधुनिक कॅमेरे, ड्रोन, लॅपटॉप, प्राण्यांचे दात, काळय़ा बाहुल्या, भूत शोध यंत्र, तांत्रिक पुस्तके, कावळय़ाचे पंख असे साहित्य आढळून आले आहे.
उच्चशिक्षित महिला साथीदार
या प्रकरणात पोलिसांनी कुलदीप याची साथीदार स्नेहा शिंदे हिला अटक केली आहे. स्नेहाने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुशिक्षित असतानाही तिने हा प्रकार केल्याने पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.