ठाणे : दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून हा प्रकल्प येत्या मे महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिली. तसेच डायघर येथील मुख्य घनकचरा प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्षाअखेर पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेचा डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. तोपर्यंत भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने खासगी जागा भाडेतत्वावर ताब्यात घेतली आहे. डायघर आणि भंडार्ली या दोन्ही प्रकल्पांच्या कामाची आयुक्त शर्मा यांनी शुक्रवारी सकाळी पाहाणी केली. या ठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असल्यामुळे या प्रकल्पाचा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि दुर्गंधी येणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले.
भंडार्ली येथील कचरा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. येथे वाहनांच्या वाहतूकीसाठी मुख्य रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून जागेच्या सभोवताली कुंपन बांधणे, पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी चर खोदणे, बोअरवेल खोदणे आणि कार्यालयाची उभारणी करणे, एमआरएफ यंत्र उभारणीसाठी प्लॅटफॉर्म तयार करणे तसेच इतर कामेही सुरु आहेत. या ठिकाणी ३ एमआरएफ यंत्र कार्यान्वित राहणार आहेत. प्रत्येक यंत्र ३५० टन क्षमतेचे असून त्यामध्ये जवळपास एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. हा प्रकल्प मे महिन्यात पूर्ण करून प्रथम २ एमआरएफ यंत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे, असेही आयुक्त डॉ. शर्मा यांनी सांगितले. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना यावेळी दिले.
डायघर येथे घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत असून हा ठाणे महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचीही शर्मा यांनी पाहणी करून आढावा घेतला. या प्रकल्पामध्ये बंदिस्त पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून विशिष्ट तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता, वृक्ष लागवड आणि संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पातून १३ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पाचे स्थापत्य काम प्रगतिपथावर असून हा प्रकल्प वर्षाअखेर कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील एमआरएफ यंत्र परदेशातून येणार असून याचा कार्यादेश देण्यात आला आहे. मे महिन्यात हे यंत्र येण्याची शक्यता असून ६ विभागात यंत्र कार्यान्वित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षाअखेर एमआरएफ सुविधा सुरु करण्यात येणार आहे, असेही आयुक्त शर्मा यांनी सांगितले.
बांधकाम आणि तोडफोड साहित्याचा पुर्नचक्रीकरण प्रकिया प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी करून प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील रस्त्यावरील राडारोडा तात्काळ उचलून प्रकिया ठिकाणी आणावे तसेच राडारोडा उचलण्यास विलंब झाला तर संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त डॉ. शर्मा यांनी यावेळी दिला.