ठाणे : शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देवून पावसाळ्यापूर्वी स्वच्छता, सार्वजनिक शौचालय साफसफाई, रस्त्याची साफसफाई, फुटपाथ स्वच्छता तसेच रस्त्यावरील डेब्रिज तात्काळ उचलण्याच्या कडक सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे (Sanjay Herwade) यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. महापालिकेच्या कै.अरविंद पेंडसे सभागृहात बुधवारी त्यांनी सर्व उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, निरीक्षक यांच्या समवेत तातडीने बैठक घेवून संपूर्ण स्वच्छता, साफसफाई कामाचा आढावा (Review) घेतला. शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती नळ व्यवस्था, साफसफाई, रस्त्यावरील साफसफाई, तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, डेब्रिज उचलणे तसेच परिसर स्वच्छता तसेच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याबाबत कडक शब्दात सूचना अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या.
दरम्यान शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाबाबतही सतर्क राहण्याच्या कडक सूचनाही त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. यासोबतच शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधितांना दिले. शहरातील गृहसंकुलाशी समन्वय साधून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच प्रत्येक प्रभाग समिती निहाय उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक केलेल्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.