उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावते, याचा राग आल्याने एका रहिवाशाने आणि त्याच्या आईने पैशाचा ३९ वर्षीय महिलेला आपल्या राहत्या घरात बेदम मारहाण, शिवीगाळ करून धारदार चाकुने या महिलेची निर्घृण हत्या केली. रविवारी सकाळी सात वाजता कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात ही घटना घडली. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
रंजना जैसवार (३९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ती ब्युटी पार्लर चालवित होती. या महिलेचे पती राजेश मुंबईत सेल्समन म्हणून नोकरी करतात. जैसवार यांना तीन मुले आहेत. मलंग रस्त्यावरील चक्कीनाका येथील प्रभावती निवासमध्ये हे कुटुंब राहते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसवार कुटुंबीयांच्या घर परिसरात आरोपी राजभर कुटुंब राहते. या कुटुंबाशी राजेश जैसवार, पत्नी रंजना यांचे चांगले संबंध होते. या कुटुंबातील अजय राजभर रंजनाचा मित्र होता. या ओळखीतून रंजनाने अजयला एक लाख रूपये उसने दिले होते. रंजनाने अजयकडे पैसे परत देण्याची मागणी सुरू केली होती. पैसे देण्यास अजय टाळाटाळ करत होता. रंजनाने हा विषय राजभर कुटुंबीयांना सांगितला होता. तेव्हापासून राजभर आणि जैसवार कुटुंबांमध्ये वाद सुरू होते.
शनिवारी संध्याकाळी राजेश जैसवार कामावरून घरी परतले. पत्नी रंजना घरात नव्हती. राजेश यांनी पत्नीला मोबाईलवर संपर्क केला. तिने आपण कामानिमित्त बाहेर आले आहे. थोड्याने वेळाने परत येते, असे पतीला सांगितले. पत्नी घरी येईल म्हणून राजेश वाट पाहत बसले. बराच वेळ झाला पत्नी घरी येत नाही म्हणून राजेश, त्यांच्या मुलांनी रंजना यांना मोबाईलवर संपर्क सुरू केला. तिचा मोबाईल बंद येत होता. राजेश यांनी चक्कीनाका परिसरात पत्नीचा शोध घेतला ती आढळून आली नाही.
रविवारी पहाटे घराबाहेर पडून राजेश यांनी पत्नीचा शोध घेतला. सकाळी सात वाजता राजभर कुटुंबीयांच्या घराबाहेर गर्दी आणि घरातून मोठ्याने आवाज येत असल्याचे राजेश यांना दिसले. ते तेथे गेले. त्यांना राजभर यांच्या घरातील ओटीवर पत्नी रंजना रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे दिसले. राजेश यांनी जवळ जावून पाहिले पत्नीच्या सर्वांगावर चाकुने वार करण्यात आले होते.
राजेश यांना समजले की रंजनाने अजयचा भाऊ विजय आणि त्यांची आई लालसादेवी यांच्याकडे अजयला दिलेले एक लाख रूपये परत मागितले. त्याचा राग अजयचा भाऊ विजय, आई लालसादेवी यांना आला. लालसादेवीने रंजनाला शिवीगाळ, मारहाण केली आणि विजयने रंजनावर चाकुने वार करून तिला जागीच ठार मारले, अशी तक्रार राजेश जैसवार यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत.