मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप - मनसेला 'जशास तसे उत्तर' देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १४ मे रोजी ते स्वतः: बीकेसीमध्ये सभा घेणार आहेत. तेव्हापासून 'जशास तसे उत्तर' देण्याची रणनीती आणखी आक्रमकपणे राबवली जाणार आहे. इतकेच नव्हे तर ते स्वतः पुन्हा ८ जूनला भव्य सभा घेणार आहेत. तेव्हापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भाजप - मनसे युतीच्या आक्रमक राजकारणाला सवाई आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्याचे आदेश देणार आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी, यासाठी माजी मुख्यमंत्री व भाजपच्या वतीने आगामी मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस हे जंग जंग पछाडतायेत. त्यासाठी ते व त्यांचे समर्थक महाविकास आघाडीला 'डॅमेज' करण्यासाठी छोट्यात छोटी संधीही सोडत नाहीत. त्यासाठी भाजपाला केंद्राकडून ईडी, सीबीआय,आयटी यांसारख्या यंत्रणाचा मुक्तपणे वापर करण्यासाठी साहाय्य मिळत आहे.
भाजपने या सर्व यंत्रणा सोबतीला घेतल्या आहेत. या यंत्रणांनी महाविकास आघाडीला अक्षरश: जेरीस आणले आहे. इतकेच नव्हे तर हिंदुत्वाच्या मुद्दयांवर शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी त्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवा, अशी हिंदुत्ववादींना चेतवणारी कडवट भूमिकाही घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीतील मुत्सुद्दी नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी या राजकारणातील भाजपच्या कूटनीतील पुरून उरण्यासाठी 'काउंटर अटॅक' करण्याची रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार ठाकरे यांनी मुंबईचे डॅशिंग कमिशनर संजय पांडे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. पांडे यांनी आतापर्यंत भाजपचे नारायण राणे, नितेश राणे याना अटक करून दाखवली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते, राणे दाम्पत्यांना जेलमध्ये टाकले. याशिवाय 'मुंबई बँक घोटाळा' प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आघाडी सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपची धडाडणारी तोफ म्हणजे किरीट सोमय्या यांनाही जेरीस आणले. आजही भाजप व मनसेच्या नेत्यांमध्ये पांडे यांची प्रचंड दहशत आहे.
नव्या रणनीतीनुसार संजय राऊत हे आक्रमकपणे भाजपवाल्याना प्रत्यत्तरे देत आहेत. त्रासदायक भाजप नेत्याची नवनवीन प्रकरणे शोधून काढून त्यांच्यावर यशस्वीरीत्या वचक ठेवत आहेत. त्यांच्या साथीला विनायक राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे आहेत. युवा नेते वरुण सरदेसाई, राहुल कनाल, सुरज चव्हाण हेही वेळ पडल्यास रस्त्यावर उतरवून आक्रमक शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत आहे.
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी