पुणे : मराठी अभिनेते सुभोध भावे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अगदी बेधडकपणे बोलणारे म्हणून त्यांची ओळख आहे. अशातच त्यांनी शिक्षण आणि राजकारण याविषयी केलेल्या वक्तव्यानं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'ज्यांची लायकी नाही अशा राजकारण्यांच्या हाती आपण देश सोपवून मोकळं झालो, आपण देशाचा विचार करत नाही'. असं विधान सुबोध भावेंनी केलं आहे. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून 'शतसूर्याचे तेज' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सुबोध भावे यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावलं होतं . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते .
यावेळी भाषणात बोलताना सुबोध भावे यांनी 'ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर 'आपल्याला असं वाटतंय की ते जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील. पण त्यांनी मागच्या काही वर्षांत जे काही करुन ठेवलय ते आपल्या समोर आहे' असंही सुबोध भावे म्हणालेत. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसं आता होताना दिसत नाही, असं म्हणत सध्याचे राजकारण आणि राजकारणी यांच्यावर सुबोध भावे यांनी टीका केली आहे. 'चांगला देश निर्माण करायचा असेल तर येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण देऊन राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल'. असंही ते यावेळी म्हणाले.
'राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते सगळेजण काय करतात हे आपण रोजच पाहत आहे', असा खोचक टोलाही त्यांनी राजकारण्यांना मारल्याचं पहायला मिळालं. सुबोध भावेंनी केलेलं हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरतंय.