तुम्ही एटीएममध्ये गेलात, पैसे काढण्यासाठी रक्कम आणि पासवर्ड (पिनकोड) टाकला आणि खात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेजही आला. मात्र, एटीएममधून पैसेच आले नाही असं तुमच्यासोबत घडलंय का? बऱ्याच लोकांसोबत असं घडलंय. असं झालं की संबंधित व्यक्ती काळजीत पडते. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. खात्यातून पैसे कमी झालेत आणि एटीएममधून मिळाले नाहीत तर अशा स्थितीत काय करायला हवे याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) ठोस नियम केले आहेत. यानुसार अशा परिस्थितीत खातेधारकाचे पैसे त्याच्या खात्यावर पुन्हा जमा करण्याची जबाबदारी बँकेवर टाकण्यात आलीय.
एटीएममधून पैसे काढताना खात्यातून पैसे कमी होऊनही रोख रक्कम मशिनमधून न मिळण्याला एटीएमची यंत्रणा दोषी असते. त्यामुळे अशावेळी बँकेने स्वतः दखल घेऊन हे पैसे खातेधारकाला परत करणे आवश्यक आहे. यासाठी आरबीआयने (RBI) वेळेचे मर्यादा देखील दिलीय. अशी घटना झाल्यानंतर संबंधित बँकेने पुढील ५ दिवसांमध्ये हे पैसे परत देणे बंधनकारक आहे.
बँकेने आरबीआयच्या नियमानुसार ५ दिवसांमध्ये खातेधारकाचे कमी झालेले पैसे जमा न केल्यास बँकेवर कारवाईचीही तरतूद आहे. यानुसार ५दिवसांनंतर उशीर होणाऱ्या प्रत्येक दिवशी संबंधित बँकेवर १०० रुपयांचा दंड लावला जातो.
तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही एटीएम मशिन स्लॉटमध्ये घातल्यानंतर रक्कम टाकून पिन टाकला आणि तरीही पैसे आले नाही तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये पैसे कमी झाल्याचा मेसेज आलाय का हे तपासा. याशिवाय अधिक खात्री करण्यासाठी तुम्ही मिनी स्टेटमेंट किंवा बँक व्यवहार तपासून पैसे कमी झालेत की नाही याची खातरजमा करु घ्या. यात एटीएममधून पैसे न मिळताच तुमच्या खात्यातून पैसे कमी झाले असतील तर तुम्ही ५ दिवसांची वाट पाहू शकता. या ५ दिवसात तुमचे पैसे परत आले नाही तर तुम्ही याबाबत बँकेकडे तक्रार करु शकता.
खरंतर एटीएममधून पैसे मिळालेले नसतानाही खात्यातून पैसे कमी झाल्यास याची जबाबदारी बँकेवर टाकण्यात आलीय. मात्र, अशा स्थितीत तुम्हाला खबरदारी म्हणून तक्रार करायची असेल तर तुम्ही ती करु शकता. तुमचे पैसे खात्यातून कमी होऊन 30 दिवस उलटून गेल्यानंतरही परत आले नसतील तर तुम्ही तक्रार निवारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करू शकता.