अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोन्स यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यावर समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. गेल्या काही वर्षांत विज्ञान तंत्रज्ञानानं अनेक गोष्टींचा शोध लावला आहे. माणसाचं आयुष्य आमूलाग्र बदलू शकतील अशा या काही गोष्टींमुळे अर्थात काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. त्याचा ऊहापोह करणारा लेख, सरोगसी मातृत्वाविषयीच्या तीन मान्यवरांच्या प्रतिक्रियांसह..
आरोग्य क्षेत्रात विज्ञानानं झपाटय़ानं केलेली प्रगती, नैसर्गिकरीत्या शक्य नसलेल्या गोष्टी घडवून आणण्याची आपली जिद्द, विकसित होणारं, विस्मित करणारं तंत्रज्ञान आणि आपली काळानुरूप बदलती मानसिकता हे सारंच फार वेगळं आहे. ‘इंटरेस्टिंग’ आहे आणि भविष्याची चाहूल देणारं आहे!
तंत्रज्ञानाचा आवाका अफाट आहे. जे काही दशकांपूर्वी अशक्य वाटत होतं ते आज प्रत्यक्षात अवतरत आहे. किंवा आज जे संशोधन अवस्थेत आहे ते उद्याची वस्तुस्थिती असणार आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीअिरग, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जेनेटिक्स अशा अनेक विज्ञान शाखा एकत्र येऊन अद्भुत गोष्टी घडत आहेत. अगदी थोडी उदाहरणं बघितली तरी याचा अंदाज येईल. अवयवदान, अवयव प्रत्यारोपण हे तर आता आपल्याला चांगलंच माहीत आहे. याहीपुढे जाऊन अवयव पुनर्निर्मिती (ऑर्गन रीजनरेशन) शक्य होणार आहे. बायोइन्क, ३ डी पिंट्रिंग अशी काही तंत्रं वापरली जात आहेत. मूळ पेशी (स्टेम सेल्स) वापरून अनेक असाध्य आजारांवर मात करणं शक्य होणार आहे. बाळ जन्मताच त्याच्या मूळ पेशी स्टेम सेल बॅँकेत जतन करण्यासाठीची सोय उपलब्ध आहे. भविष्यात काही आजार झाल्यास या मूळ पेशींद्वारे उपचार शक्य असल्याचं म्हटलं जातंय. जनुकीय संशोधन भविष्यात होऊ शकणाऱ्या व्याधींची शक्यता आधीच ओळखू शकतं. अनेक आनुवंशिक आणि इतर आजारांवर जनुकीय उपचार शक्य होणार आहेत. इतकंच काय, तर जनुकं ‘एडिट’ करून काही काळातच ‘ऑर्डरप्रमाणे बाळ’ ही संकल्पनाही जन्माला घालता येऊ शकेल असं दिसतंय. प्रजनन क्षेत्रात तंत्रज्ञानानं अफाट प्रगती केली आहे. स्त्री गर्भवती असताना बाळामध्ये काही व्यंग असल्याचं सोनोग्राफी आणि इतर चाचण्यांमध्ये लक्षात आल्यास बाळाच्या जन्मापूर्वीच शस्त्रक्रियेनं व्यंग नाहीसं करण्याचं तंत्र विकसित होत आहे. स्वत: गरोदर न होताही स्वत:चं बाळ निर्माण करणं वेगवेगळय़ा पद्धतींनी शक्य होत आहे. अशी विज्ञानातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक उदाहरणं देता येतील. ती निश्चितच अचंबित करणारी आहेत. मात्र त्याच बरोबरीने काही वेळा नैतिक, भावनिक, सामाजिक, कायदेशीर प्रश्नही अशा नवीन आरोग्य तंत्रज्ञानात उपस्थित होत आहेत हेही नमूद करायला हवं.
सरोगेट प्रेग्नन्सी हा विषय तसा नवीन नाही. अलीकडेच सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोन्स यांना सरोगसीच्या मार्गानं झालेल्या बाळाचं आगमन, त्यानंतर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यासह अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे हा विषय चर्चेत आहे.
‘सरोगसी’ शब्दाचा अर्थ ‘च्या ऐवजी’, ‘च्या बदली’ किंवा ‘पर्यायी’. सरोगेट प्रेग्नन्सी म्हणजे ज्या जोडप्याला किंवा व्यक्तीला मूल हवं असेल, पण काही कारणानं ते शक्य नसेल, तर दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात ते मूल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जन्मास घालणं. पारंपरिक सरोगसीमध्ये पुरुषाचे स्पम्र्स (शुक्राणू) सरोगेट मातेच्या शरीरात सोडून तिथे तिच्या बीजाबरोबर फलन होऊन मूल होतं. अशा प्रकारे सरोगेट माता ही जैविक- ‘बायोलॉजिकल माता’ असते आणि तिचं बाळाशी जेनेटिक नातं (लिंक) असतं. गेल्या काही वर्षांत कृत्रिम गर्भधारणा, इन विट्रो फर्टिलायजेशन (शरीराबाहेर प्रयोगशाळेत गर्भाची निर्मिती), Assisted Reproductive Technology (ART) अशी अत्याधुनिक तंत्रं झपाटय़ानं विकसित झाली. ‘गेस्टेशनल (Gestational) सरोगसी’ आता सामान्यत: दिसते. यामध्ये मूल होण्यासाठी इच्छुक जोडप्याचं अंडं आणि शुक्राणू यांचं प्रयोगशाळेत फलन करून हा गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात रुजवला जातो आणि तिथे त्याची वाढ होऊन बाळ जन्मतं. अशा सरोगसीमध्ये सरोगेट मातेचा कोणताही जेनेटिक संबंध बाळाशी नसतो आणि सर्व जीन्स या इच्छुक जोडप्यांचे असतात. ‘गर्भ माझा, गर्भाशय तुझं’ अशी ही व्यवस्था असते. गरज लागल्यास एग डोनर/ स्पर्म डोनरची मदत घेतली जाते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पालकत्वाचा आनंद अनेक जोडप्यांना, व्यक्तींना मिळतो आणि ते एक वरदान ठरलं आहे. अशा प्रकारचे कोणतेही उपाय, प्रकार हे अजून तरी बऱ्यापैकी खर्चीक असतात, गुंतागुंतीचे असतात. काही वेळा प्रयत्न सफल होत नाहीत. मानसिक, भावनिक घालमेल बरीच होऊ शकते. पण विज्ञानाची ही भरारी निश्चित अचंबित करणारी आहे.
आधीची नैसर्गिक गर्भधारणा किंवा कृत्रिम गर्भधारणेचे प्रयत्न असफल झाले असतील तर, स्त्रीचं वय वाढलं म्हणून, गर्भारपण धोकादायक होऊ शकतं म्हणून किंवा जोडप्यांपैकी एकामध्ये प्रजननक्षमता नसल्यानं किंवा ज्यांना काही आजारांमुळे गर्भारपण धोकादायक ठरू शकतं किंवा काही विशिष्ट औषधं घ्यावी लागत असल्यानं गर्भवती राहणं योग्य नसतं, अशी जोडपी वैद्यकीय कारणांसाठी सरोगसीचा मार्ग स्वीकारतात आणि मातृत्वाचं, प्रजननाचं समाधान आणि आनंद मिळवू शकतात. जसे सामाजिक बदल होत गेले, तसे गेल्या काही वर्षांत सरोगसीच्या कक्षा रुंदावत आहेत. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष यांना मूल हवं असेल तर दत्तक घेण्याखेरीज सरोगसी हा एक मार्ग मिळाला. समिलगी जोडप्यांनाही आई-बाबा होण्याचा आनंद मिळणं शक्य झालं आहे. आतापर्यंत चर्चिल्या गेलेल्या सरोगसीच्या उदाहरणांमध्ये मुख्यत: हॉलिवूड, बॉलिवूड आणि एकंदर श्रीमंत वर्गातील मंडळी आहेत.
स्त्रिया सरोगेट माता होण्यास तयार होत आहेत. सहसा याचं कारण मिळणारा आर्थिक मोबदला असंच असतं यासाठी इच्छुक पालक आणि सरोगेट माता यांच्यात एक करारही होतो. कोणत्या स्त्रीला सरोगेट माता म्हणून काम करता येईल, यासाठी निवड-निकष ठरलेले असतात, कधी ही स्त्री जोडप्याच्या नात्यातील, ओळखीतील असू शकते किंवा पूर्णत: अनोळखी स्त्री असते. त्यांचा आत्मसन्मान, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा/ विरोध, काही वैद्यकीय गुंतागुंत झाल्यास किंवा जन्मलेलं बाळ सव्यंग असल्यास काय, अशा अनेक बाबी/ प्रश्न या व्यवस्थेत आहेत. गर्भाशय उधार घेणं- ‘k Rent a wombl अशा प्रकारे एक प्रकारची इंडस्ट्री काही देशांत तयार झाल्याचं दिसतं. समाजमाध्यमांवर सरोगेट मातांसाठी अनेक ग्रुप आहेत, भारतात ‘सरोगेट माता हवी’ अशा अनेक विचारणाही परदेशातून होताना दिसतात. काही देशांत कोणत्याही प्रकारच्या सरोगसीवर बंदी आहे. काही देशांत याला परवानगी आहे, तर काही देशात र्निबध आहेत, पण ते फारसे पाळले जात नाहीत. आज आपण ‘आउटसोर्सिग’च्या जमान्यात राहतो. सरोगसी हेदेखील एक प्रकारचं आउटसोर्सिग आणि ‘थर्ड पार्टी रीप्रॉडक्शन’ आहे. भारतात सरोगसीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वं ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’नं दिलेली आहेत आणि याविषयीचा ‘सरोगसी अॅक्ट २०२१’ अलीकडेच २५ डिसेंबर २०२१ ला प्रकाशित झाला आहे. यात अनेक र्निबध अपेक्षित आहेत.
अलीकडे ज्यांना वैद्यकीयदृष्टय़ा कोणतंही सक्तीचं कारण नाही, पण या ना त्या कारणानं नैसर्गिकरीत्या होणारं ९ महिन्याचं गर्भारपण, त्यातून होणारे शारीरिक बदल, कदाचित त्यातून होऊ शकणाऱ्या शारीरिक समस्या, यासाठी वेळ नाही, मानसिकता नाही, पण स्वत:चं मूल हवंय, अशा व्यक्तीसुद्धा सरोगसीचा आधार घेताना दिसतात. मॉडेलिंग, मनोरंजन जगतातील काही स्त्रिया, खेळाडू, कॉर्पोरेट उच्चपदस्थ असलेल्या काही स्त्रियांनी हा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली असल्याचं म्हटलं जातंय आणि हे एक प्रकारे आउटसोर्सिगचं एक टोकाचं उदाहरण आहे. ‘करिअर का घर?’ हा प्रश्न स्त्रियांना अनेक दशकं पडत आला आहे. पण करिअरमध्ये ब्रेक येऊ नये, वेळ नाही म्हणून, स्वत: आई होण्याचा बहुतांश स्त्रियांना हवाहवासा वाटणारा भावानुभव नाकारून दुसऱ्या स्त्रीच्या उदरात आपल्या गर्भाला वाढवून त्याच्या जन्मापूर्वीच एक प्रकारचं ‘बेबीसिटिंग’ करून घेणं हे फार वेगळं आहेच, पण गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे, जरी आज अशा स्त्रियांची संख्या अत्यंत कमी असली आणि मुख्यत: अमेरिकेत अशी ठळक उदाहरणं असली, तरी हे बदलत्या मानसिकतेचं चिन्ह आहे का? गर्भारपण लगेच नको असेल, तर तरुणपणीच स्त्रिया वैद्यकीय मदतीनं शरीरात अंडाशयातील तयार होणारं अंडं (( egg)) जतन (( egg freezing, oocyte cryopreservation)) करण्यासाठी ठेवू शकतात आणि नंतर कोणत्याही वयात आई बनू शकतात. काही जगप्रसिद्ध मोठय़ा कंपन्यांनी त्यांच्या स्त्री कर्मचाऱ्यांना त्यांचे ‘एग’ जतन करण्याचा खर्च ही एक सुविधा (perk ) म्हणून उपलब्ध करून दिली आहे, असंही वाचनात आलं. जेणेकरून या स्त्रियांना कालांतरानंसुद्धा गर्भवती राहता येईल आणि ही सुविधा सरसकट सर्वाना आहे. म्हणजे केवळ काही वैद्यकीय कारणांसाठी (उदा- कुणा स्त्रीला कर्करोगाची औषधं सुरू आहेत, कुणाला बाकी काही शारीरिक समस्या आहेत) नव्हे, तर ‘बाय चॉईस’ कुणालाही ही सवलत मिळू शकते. ही खर्चीक बाब आहे, पण काही तरुण स्त्रिया याचा लाभ घेत आहेत. यातून एक संदेश असा जातो, की ‘तुम्ही सध्या करिअर करा, नंतर सावकाश फॅमिली सुरू करा (गरोदर व्हा)’. अधिक रजा, कामाच्या लवचीक वेळा, सशक्त ‘सपोर्ट सिस्टिम’ यावर भर देण्यापेक्षा अशा सुविधा दिल्या, अशी टीकाही अमेरिकेत झाली. तसंही सध्या जगभरात तिशीनंतरच गरोदर होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. करिअर स्थिरता, मनासारखा जोडीदार वेळेत न भेटणं अशा कारणांनी आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा तसाही पुढे ढकलला जात आहे असं दिसतं, (आणि अर्थात त्यासाठी विविध गर्भनिरोधकं वापरून) निसर्गनियमानं होणाऱ्या बाबी वेगळेपणानं, तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. तशा संधी आणि स्वातंत्र्य आज शक्य आहे.
सोयीसुविधा बघणं हा आजच्या आधुनिक जीवनशैलीत स्थायीभाव झाला आहे. किंबहुना आपल्या अनेक ‘चॉइसेस’चा तो ‘ड्रायिव्हग फोर्स’ असतो. झटपट, शॉर्टकट, फारशी तोशिश न करता मिळणाऱ्या गोष्टी लवकर लोकप्रिय होतात, हव्याहव्याशा होतात. तंत्रज्ञान आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि रोजच्या जीवनात आपण त्या स्वयंपाकघरापासून ऑफिसपर्यंत सहजतेनं वापरत असतो, निवडत असतो. स्वयंपाकघरात तर आधुनिक आयुधांनी क्रांती केली आहे. आरोग्य क्षेत्रातही आजच्या घडीलाही अशी उदाहरणं आहेत की जे तंत्रज्ञान हे केवळ वैद्यकीय गरज या चौकटीत न राहता ‘बाय चॉईस’सुद्धा आपण आपलंसं करतोय. अनेक उदाहरणं आहेत. जन्मत:च असलेलं किंवा अपघातानं/ काही आजारानं झालेलं शारीरिक व्यंग दूर करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी (पुन:निर्माण शल्यक्रिया) हे रुग्णांसाठी वरदान आहे, सामान्य आयुष्य जगण्यासाठी वैद्यकीयदृष्टय़ा आवश्यक आहे. वृद्ध दिसू नये किंवा अधिक सुंदर दिसावं म्हणून ‘कॉस्मेटिक सर्जरी’ हा मात्र स्वत:चा ‘चॉईस’ आहे, ऐच्छिक आहे. पैसे आहेत, इच्छा आहे, तर माणूस अशा निवडी करू शकतो आहे आणि त्यात त्याला अधिक आनंद, आत्मविश्वास मिळू शकतो. कदाचित त्याच्या करिअरसाठी ते आवश्यक असेल (उदा.बॉलिवूड).
पूर्वी इतकी वैज्ञानिक प्रगती नव्हती, ‘देवाच्या मनात नाही, नशिबात नाही, तर जाऊ दे’, ‘निसर्गनियमानं जे होतंय ते ठीक, ते दु:खद असलं तरी आपण ढवळाढवळ नको करायला त्यात’, अशा काही विचारधारा अधिक असायच्या. पण आता विज्ञान-तंत्रज्ञान आपल्याला अनेक नवीन दालनं खुली करून अशक्य ते शक्य किंवा ‘हवं तसं’ करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. तंत्रज्ञान विकसित व्हावंच. ते मानवाच्या बुद्धिमतेचं आणि परिश्रमाचं यश आहेच. हे आधुनिक तंत्रज्ञान वैद्यकीय उपचार या मर्यादेत असावं की सोय म्हणून असावं?, आपल्याला अधिक महत्त्वाचं काय आहे? जे नैसर्गिकरीत्या शक्य आहे ते कृत्रिमरीत्या करावं का? निसर्गाशी कितपत फारकत घ्यावी, याचा आपल्या तब्येतीवर इतर काही परिणाम होईल का, असे अनेक प्रश्न नक्कीच निर्माण होतात. कदाचित यात बरोबर-चूक, योग्य-अयोग्य असं कदाचित काही नसेल, कारण ते प्रत्येकाच्या जीवनविषयक दृष्टिकोनावर अवलंबून असेल.
या साऱ्या तंत्रज्ञानाचा वापर कसा, कुठवर, कशासाठी करायचा, कुठे थांबायचं, हे भान, सारासार, समतोल विचार, नियमांची चौकट (Regulations) असणं या साऱ्या प्रगतीबरोबर महत्त्वाचं ठरणार आहे.
‘हक्क अबाधित असायलाच हवेत’
सरोगसी हा विषय सध्या बराच चर्चिला जात आहे; किंबहुना सरोगसीचं नियंत्रण करण्याबद्दलचा एक कायदा भारतामध्ये २०२१ मध्ये आणला गेला आहे. एखाद्या स्त्रीनं लग्न करायचं नाही किंवा मूल नकोय असं म्हटलं, की ‘फारच करिअरच्या मागे लागल्यात हल्लीच्या मुली’ आणि सरोगसी करवून मूल घ्यायचं ठरवलं तर ‘आयतं मूल हवंय, फिगर बिघडवू द्यायची नसेल’, ‘स्वत:चं नसतं त्याला प्रेम देणं अशक्य’, असे ताशेरे मारले जातात. पालकत्व एकाच प्रकारानं प्राप्त होत असतं हे यामागचं गृहीतक.
वास्तविकरीत्या जैविक, दत्तक आणि सावत्र मुलं, सुना, जावई आणि आपल्या सान्निध्यात असणारी मुलं यांच्याबरोबरचं सामाजिक पालकत्व आपण निभावत असतोच ना? सरोगसी करवून घेणाऱ्यांच्या (विशेषत: बाईच्या) बाबतीत अस्वस्थ होण्यामागची मूळ धारणा अशी, की घर, मूल इत्यादी याच बाईच्या प्राथमिक जबाबदाऱ्या असतात, त्यातच बाईला कृतार्थ वाटलं पाहिजे. जर घरदार सांभाळून नोकरी, करिअर जमवता आलं, तरच तिनं त्यात पडावं, वगैरे. काही समाजमान्य कारणास्तव तिला कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलता आल्या नाहीत तर घरातील इतर स्त्रीनं बिनमोलाचं काम तिच्यासाठी, म्हणजेच कुटुंबासाठी करावं अशी अपेक्षा असते. शिवाय बाईनं ठरवून दिलेल्या चाकोरीतील काम नाकारलं तर तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, तिच्या बाईपणावर, आई असण्यावरच शंका घेतली जाते. अगदी लग्नाअंतर्गत मूल दत्तक घेतलं तरी.
लग्न केल्यानंतर ‘मूल नको’ असं म्हणणाऱ्या दांपत्याला स्वकेंद्रित, बेजबाबदार ठरवलं जात असेल, तर मग पारंपरिक पद्धतींना (म्हणजेच, आईवडिलांनी ठरवून दिलेल्या स्वजातीय विवाहांतर्गत नवऱ्यापासून होणारं मूल बाईनं जन्माला घालणं या प्रक्रियेला) डावलून दत्तक मूल घेणाऱ्यांची परिस्थिती काय होत असेल? खरं तर निरनिराळय़ा पद्धतीचं पालकत्व समाजानं स्वीकारलं तर कुटुंबाच्या चौकटीच्या बाहेर असलेले लोकसुद्धा पालकत्वाचा आनंद अनुभवू शकतील, ही चांगली बाब नाही का? लैंगिक संबंध ठेवणं, मात्र त्यातून मूल न होऊ देणे हे गर्भनिरोधनाच्या माध्यमातून आपल्याला मान्य असेल, तर मग एखाद्या व्यक्तीला मूल हवं आहे, पण त्यासाठी लैंगिक संबंध ठेवायचा नसेल, तर ते का मान्य करू नये?
एकीकडे अपारंपरिक पालकत्वांना सामाजिक मान्यता मिळवून देण्यासाठी आणि दुसरीकडे स्वत:च्या शरीराच्या माध्यमातून सरोगसी करून देणाऱ्या (आणि जात, वर्ग, वैवाहिक दर्जा या उतरंडीत बहुधा वंचित राहिलेल्या)
बाईचे आणि अपत्याचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी आपण तत्पर असायला हवे.
– डॉ. मनीषा गुप्ते
(‘महिला सर्वागीण उत्कर्ष मंडळ (मासूम),
पुणे’च्या सह-संस्थापक आहेत.)
सरोगसीच्या प्रमाणात वाढ
बाळ हवं असं वाटण्याचं वय अलीकडे वाढत चाललं आहे. मध्यमवर्गीय, उच्चवर्गीयांत तरी हे वय हळूहळू वाढतंय आणि वयाच्या अशा टप्प्यावर ते येतंय, की अजून करिअर घडायचं आहे, कोणत्याच वैयक्तिक गोष्टीसाठी वेळ नाही, शिवाय अलीकडे तरुणींमध्ये पाळी जायचंही वय कमी होत चाललं आहे.
शिक्षण संपवून, करियर घडवून, पैसे मिळवून आता कुठं स्थिरस्थावर होतंय, त्याच वेळी लग्न करून मुलाबाळांचा विचार करेपर्यंत पस्तिशी येते. शिवाय अलीकडे प्रजननक्षमतेचं प्रमाणही कमी होतं आहे. त्यासाठी ‘आयव्हीएफ’चा पर्याय सहज सुचवला जातो. जो पूर्वी केवळ श्रीमंतांसाठीचा पर्याय होता, तो आता मध्यमवर्गापर्यंत आला आहे.
स्वत:चंच मूल व्हावं, ही इच्छा मात्र अजून कमी होत नाही आपली. आयव्हीएफचा पर्याय खूप वेळखाऊ आहे. खूप औषधं, हार्मोन्स यांचा मारा स्त्रीला आपल्या शरीरावर करून घ्यावा लागतो, त्या वेळी मासिक पाळीची प्रत्येक सायकल काळजी वाढवणारी असते आणि वयाच्या त्या टप्प्यावर करिअरचा मध्यही आलेला नसतो. अशा वेळी गर्भधारणा, गर्भारपण, बाळंतपण, काही वेळा सिझेरियन हे सगळं जमून येणं नेहमीच शक्य होईल असं नाही. अशा वेळी दुसऱ्या पर्यायाचा शोध घेतला जातो. त्यातलाच एक सरोगसी. त्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. आपलंच जैविक मूल आपल्याला वयाच्या या टप्प्यावर आपल्या शरीरात नाही वाढवता आलं, तरी ते आपल्याला दुसऱ्या स्त्रीच्या गर्भातून मिळू शकेल हे वाटणं सामान्य होईल का, असं आता मनात येतं आहे. त्याशिवाय बाळाची प्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून त्याला पुरेसं स्तन्यपान मिळालं पाहिजे हे सांगणं विरून जाईल का, याचीही काळजी वाटते आहे. म्हणूनच काही गोष्टी वेळेवर होणंही गरजेचं वाटतं. – डॉ. कामाक्षी भाटे, स्त्रीरोगतज्ज्ञ
मातृत्व-पितृत्वाची इच्छा
माझ्या लहानपणी राजा-राणीच्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा पुढील बाबींचा उल्लेख आढळायचा- ‘राजा होता निपुत्रिक. त्याला दोन राण्या होत्या पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केल्यावर राजाच्या राण्यांना संतती प्राप्त झाली’ इत्यादी. रामायण-महाभारतातही बहुपतीत्व, बहुपत्नीत्व, नियोग पद्धतीचा वापर करून संतती प्राप्त करणं इत्यादींचा उल्लेख आढळतो. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याला दुसऱ्या स्त्रीच्या सुपूर्द करणं, त्या स्त्रीनं बाळाला स्वत:च्या संततीसारखं प्रेम देऊन त्याचं पालनपोषण करणं, जमीन नांगरताना सापडलेल्या लहानग्या मुलीचा सांभाळ राजानं पोटच्या मुलीसारखा करणं इत्यादी अनेक बाबींचा उल्लेख आढळतो. भारतीय संस्कृतीत दत्तक विधानही सर्रास केलं जात असे. अशा प्रकारे विविध मार्गाचा अवलंब करून पती-पत्नी/ स्त्री-पुरुष मातृत्व-पितृत्वाची इच्छा पूर्ण करताना दिसतात.
हीच उदाहरणं सध्याच्या काळापर्यंत पुढे न्यायची झाल्यास टेस्ट टय़ूब बेबी, सरोगसी, इत्यादी आधुनिक तंत्रांचा उल्लेख करता येईल. या विविध आधुनिक तंत्रांचं आपण स्वागतच करायला हवं. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चं मूल जन्माला घालण्याचा, ते केव्हा आणि कसं व्हावं हे ठरवण्याचा हक्क आहे- अर्थातच योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार! पण या प्रक्रियेत दुसऱ्या व्यक्तींवर अन्याय होऊ नये, त्या व्यक्तीचं शोषण होऊ नये यासाठी विशिष्ट कायदेकानू प्रत्येक देशात केले जातात. या नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून विविध तंत्रांचा उपयोग करून बाळाला जन्म देता येतो.
सरोगसीच्या माध्यमातून मूल प्राप्त करणारं जोडपं आपल्या अपत्यावर कमी प्रेम करतं आणि नैसर्गिक रीतीनं बाळाला जन्म घालणारं जोडपं स्वत:च्या संततीवर जास्त प्रेम करतं, ही चुकीची धारणा आहे. शिवाय ही पद्धती स्वीकारताना नैतिक, कायदेशीर बाबींचं उल्लंघन कधी होत नाही ना, आणि झालंच तर सरोगेट मातेचं शोषण तर होत नाही ना, यावर नियंत्रण ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे! – डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, स्त्रीरोगतज्ज्ञ