एका २७ दिवसांच्या बाळाचं डोकं भिंतीवर आपटून त्याचा खून केल्याप्रकरणी या बाळाच्या आईला केरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आलं होतं, त्यामुळे ते बराच काळ आजारी असे आणि रडत असे. यातून या बाळाच्या २१ वर्षीय आईने त्याचा खून केला.
ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता या बाळाला दवाखान्यात नेलं होतं आणि त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन घरी परत आणण्यात आलं होतं. घडलेल्या या प्रकारानंतर या बाळाची तब्येत जास्त खालावल्याने त्याला तालुका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
ही महिला एका आश्रमातल्या स्वयंपाकघरात काम करत होती आणि ती तिच्या ४५ वर्षीय प्रियकरासोबत राहत होती. या प्रकरणात आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांनी तक्रार दाखल केली आहे. १० डिसेंबरला शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या बाळाच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.
प्राथमिक पाहणीत बाळाच्या पातळ त्वचेमुळे त्याला झालेली इजा त्वरीत लक्षात आली नाही, मात्र नंतर जेव्हा पोलिसांनी या बाळाच्या पालकांची चौकशी केली, तेव्हा या घटनेबद्दल माहिती मिळाली. या महिलेच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी तिची मानसिक स्थिती काहीशी ठीक वाटली नाही. त्यामुळे तिची सखोल चौकशी करण्यात आली नाही. मात्र या जोडप्याबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता असं आढळून आलं की, हे दोघे फोनच्या माध्यमातूनच एकमेकांच्या संपर्कात आले आणि आश्रमात एकत्र राहायला लागले होते.
पोलिसांनी सांगितले की, त्यानंतरच्या चौकशीत आईनेच मुलाची हत्या केल्याचे उघड झाले आणि तिला अटक करण्यात आली.ही महिला कोट्टायम येथील एका खाजगी संस्थेत शिकत होती, जेव्हा ती तिच्या प्रियकराला फोनवर भेटली आणि हे आजारी अर्भक तिच्या पुढील अभ्यासासाठी हानिकारक ठरेल म्हणून तिने मुलाला मारण्याचा निर्णय घेतला, असे पोलिसांनी सांगितले.