Mumbai Crime News : व्यसनासाठी कोणी काय करेल याचा काही नेम नाही, अशीच काहीशी धक्कादायक घटना मुंबईमध्ये उघडकीस आली आहे. पण ही घटना खरी घडली होती दिल्लीमध्ये. खरंतर 25 नोव्हेंबरला दिल्लीच्या मानसरोवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 25 नोव्हेंबरला एका महिलेने पोलिसांत आपला दहा वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पोलिसांनी प्रकरणाची तात्काळ दखल घेत तक्रार दाखल केली आणि शोध सुरु केला. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु होता.
तपासात पोलिसांना कळलं की, ज्या बिल्डिंगमध्ये तो मुलगा राहत होता. त्याच बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील एक व्यक्तीसुद्धा त्याच दिवसापासून बेपत्ता होती. या व्यक्तीचं नाव शिवशंकर होतं. संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याबद्दल आणखी माहिती जमा करण्यास सुरुवात केली, त्यामध्ये शिवशंकरला ड्रग्सच व्यसन असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी शिवशंकरचा शोध सुरु केला. शिवशंकरचा नंबर पोलिसांना सापडला त्यानंतर पोलिसांनी त्याला कॉल केला. शिवशंकरने फोन उचलला आणि तो पठाणकोटमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर लगेच शिवशंकरने फोन कट करून फोन स्विच ऑफ केला. मात्र तोपर्यंत पोलिसांनी त्याचा नंबर ट्रेस केला होता. शिवशंकर मुंबईच्या धारावीमध्ये असल्याचं दिल्ली पोलिसांना कळालं, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांशी संपर्क केला आणि त्यांची मदत मागितली.
मुंबई पोलीसांनी धारावीमध्ये काम करणाऱ्या एका एनजीओची मदत घेतली. ज्यानंतर मुंबई पोलिसांना कळलं की, चार वर्षांपूर्वी आरोपी शिवशंकर धारावीमध्ये राहत होता आणि गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो एका लहान मुलाला घेऊन येथे पुन्हा आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि रविवारी पहाटे साडेचार वाजता आरोपी शिवशंकराला माहिम रेल्वे स्टेशनवरुन अटक केली. त्यासोबतच अपहरण करण्यात आलेल्या लहान मुलाचीसुद्धा पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर जेव्हा शिवशंकरकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, या मुलाचं अपहरण त्यानं पैशासाठी केलं होतं. मुलाला विकून शिवशंकर आपलं ड्रग्सच व्यसन पूर्ण करणार होता. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं एवढ मात्र निश्चित.