कल्याण : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना एका तिकीट तपासणीच्या सतर्कतेमुळे रेल्वे सुरक्षा जवानांनी अटक केली आहे. या मुलीचा ताबा कल्याण लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दिल्लीहून मुंबईला या मुलीला निजामुद्दिन एक्सप्रेसमधून आणले जात होते. प्रवासात एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या मुख्य तिकीट तपासणीस संदेश भानुशाली यांना अल्पवयीन मुलगी आणि त्याच्या सोबत असणारे शहाबुद्दिन आणि मुस्तफा या दोन तरुणांचा संशय आला. त्यांनी सहकारी तपासणीस यु. आर. यादव यांच्या मदतीने मुलगी आणि तिच्या सोबत असणाऱ्या दोन तरुणांची चौकशी केली. त्यांना मुलीला फूस लावून पळवून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रेल्वे सुरक्षा दलाचे एन. के. सिंग यांना ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा दलाने या दोन्ही तरुणांना अटक करुन कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीचा ताबा कल्याण लोहमार्गा पोलिसांनी एका बालसंगोपन संस्थेकडे दिला आहे. दोन्ही आरोपी गुडगाव येथील रहिवासी आहेत.