पाटणा : बिहारच्या सुपौलमध्ये दुहेरी हत्याकांडाची थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मधेपुरा प्रभाग क्रमांक 8 च्या नगरसेविका माला देवी यांची दोन मुले सासुरवाडीला जायला निघाली होती, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह कोसी नदीत सापडले. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा काही जणांना संशय आहे, मात्र पोलिसांनी योग्य तपास केल्यास डबल मर्डरचा पर्दाफाश होऊ शकतो, असं नगरसेविका माला देवी यांचे म्हणणे आहे.
मधेपुरातील वॉर्ड क्रमांक आठच्या नगरसेविका माला देवी यांचा मोठा मुलगा मिट्टूची सासुरवाडी सुपौलच्या डुमरिया येथे होती. मिठ्ठू मंगळवारी रात्री उशिरा भावासोबत मधेपूरहून सासरी निघाला होता. रात्रभर दोन्ही भाऊ कुटुंबीयांशी फोनवरुन संपर्कात होते. मात्र बुधवारी सकाळी कोसी नदीत दोघा तरुणांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती काही जणांनी नगरसेविका आईला दिली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची बाईकही जप्त केली आहे. माला देवी यांनी सांगितल्यानुसार, त्यांचा मुलगा आपल्या दीड महिन्याच्या मुलाला कपडे देण्यासाठी सासरी गेला होता. आपल्या मुलाला पाहण्याची त्याला इतकी ओढ लागली होती, की त्याने भावालाही सोबत घेतले होते. मात्र त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना कधीही पाहता येणार नाही, याची आईला पुसटशी कल्पनाही नव्हती.
डीएसपी इंदर प्रकाश म्हणाले की, या प्रकरणाच्या तपासानंतरच या हत्येमागे कोणाचा हात आहे हे समोर येईल. सध्या पोलिस याला संशयास्पद मृत्यू मानत आहेत. या प्रकरणाचा लवकरात लवकर खुलासा व्हावा, यासाठी पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले आहे.