औरंगाबादः औरंगाबाद-जालना मार्गावरील गोलटगाव शिवारात 31 डिसेंबर 2021 रोजी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह विशाल रामटेके या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि करमाड पोलिसांचे मागील दहा दिवसांपासून तपासकार्य सुरु होते. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्ररकणी पुण्यातून तिघांना अटक केली. विशाल मिश्रा, शिवाजी बनसोडे, सुदर्शन चव्हाण अशी या तिघांनी नावे आहेत.
या प्रकरणी आरोपी विशाल मिथ्रा याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले की, तो पुणे येथील एका कंपनीची कार चालवत असे. मात्र नळदुर्ग पोलिसांनी ही कार लुटमारीच्या गुन्ह्यात जप्त केली होती. त्यामुळे त्याच रंगाची, कंपनीची गाडी चोरून नळदुर्ग पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीचा क्रमांक टाकून पुन्हा पुणे शहरात भाड्याने चालवण्याचा त्याचा विचार होता.
विशाल मिश्राने याने दिलेल्या कबुलीनुसार, या प्लॅनसाठी त्याने गावाकडील मित्र सुदर्शन चव्हाण आणि शिवाजी बनसोडे यांना बोलावले. पुण्यातून नागपूर गाठून तेथून ठरलेल्या रंगाची आणि कंपनीची कार भाड्याने घेऊन जालन्याला जाण्याचा बेत आखला. जालना जवळ आल्यानंतर लघुशंकेचे कारण देत रात्री 11 वाजेच्या सुमारास गाडीचालक विशाल रामटेके यास मारहाण करण्यास सुरुवात केली. विशालने विरोध केल्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण करीत त्याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. तसेच गाडीतील धारदार पट्टीने पोटावर मारून त्याचा खून केला. मृत चालकाला गाडीत टाकून औरंगाबाद मार्गावरील एका ठिकाणी टाकून दिला.