मुंबई: मुंबईच्या मानखुर्द पोलिसांनी मोठी कारवाई करत मोबाईल चोरट्यांच्या एका टोळीला जेरबंद केलं आहे. या टोळीत एकूण ७ जण असून चोरलेले मोबाईल हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर विकायचे, यामुळे चोरी झालेल्या मोबाईलचा शोध लावण्यात अनेक अडचणी यायच्या. मात्र, एका खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत या टोळीतील सात जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे मुंबईतून चोरलेले मोबाईल्स हे नेपाळ, बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये विकायचे. तर कोलकत्ता आणि यूपीमध्येही हे चोरलेले मोबाईल सर्रासपणे विकले जायचे. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकूण १७ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे ७८ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईलच्या आईएमईआय क्रमांकाच्या आधारे आणि चोरलेल्या ठिकाणावरुन त्याच्या मालकांचा शोध मानखुर्द पोलीस सध्या घेत आहेत.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर जबरदस्तीने मोबाईल खेचून पळाल्याप्रकरणी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एका २५ वर्षीय चोरट्याला गोवंडीच्या शिवाजीनगरमधून मानखुर्द पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने ज्याला चोरलेला मोबाईल विकला होता, त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेऊन तक्रारदार तरुणाच्या चोरलेल्या मोबाईलसह ३१ मोबाईल्स जप्त केले. त्यामध्ये २१ अँपलचे महागडे फोनदेखील होते. चोरलेले मोबाईल विकत घेणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे आणि चोरलेले मोबाईल तो उत्तर प्रदेश, कोलकत्ता यांसारख्या राज्यात तसेच नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये विकत असल्याचे तपासात समोर आले.त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या आणखी ५ जणांना अटक केली. यापैकी दोघांना लल्लुभाई वसाहतीतून तर घाटकोपरच्या नित्यानंदनगर भागातून एकाला अटक करून एकूण ४६ मोबाईल्स जप्त केले. त्यामध्ये अँपल कंपनीचे ४ मोबाईल होते. या टोळीकडून ७८ मोबाईल्स त्यामध्ये २५ अँपल कंपनीचे मोबाईल्स जप्त करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यांची व्याप्ती परदेशातही असून या टोळीतील अन्य सदस्यांचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.