मुंबई : बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेकदा आहाराच्या सवयी इतक्या मोठ्या फरकानं बदलतात की अनेकदा या बदललेल्या सवयी आरोग्यालाही धोकादायक ठरतात. खाण्याच्या अनिश्चित वेळा, संतुलित आहाराचा अभाव यामुळं अनेकदा रक्तातील महत्त्वाच्या घटकांचं प्रमाण हे कमीजास्त होत असतं. याच साऱ्या परिस्थितीचे परिणाम म्हणजे दिवसागणित वाढणारी मधुमेहींची संख्या. पण, तुम्हाला माहितीये का, तांदूळ किंवा गव्हाच्या पीठाऐवजी हिरव्या फणसाच्या पीठाचं सेवन केल्यास टाईप 2 चा मधुमेह असणाऱ्यांना त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात आणण्यात मोठी मदत होत आहे. एका निरीक्षणातून ही बाब समोर आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेस'नं प्रसिद्ध केलं आहे.
नेचर या एका मासिकामध्ये छापून आलेल्या निरीक्षणासंदर्भातील माहितीचा हवाला इथं देण्यात आला आहे. ज्यामध्ये सलग 12 आठवडे फणसाच्या पीठाचं सेवन केलेल्या रुग्णांमध्ये glycosylated haemoglobin (HbA1c) मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचं लक्षात आलं.
ए. गोपाळ राव, के. सुनील नाईक, ए.जी. उन्नीकृष्णन आणि जेम्स जोसेफ यांनी या निरीक्षणात मोलाचा हातभार लावला असून, भारतातील हिरव्या आणि कच्च्या फणसाची तत्त्वं ओळखत निरीक्षणासाठीच्या टाईप 2 चा मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या आहारात या पीठाचा समावेश केला होता. मे 2019 ते फेब्रुवारी 2020 च्या दरम्यानच्या काळात हे निरीक्षण पार पडलं.
जेवणाच्या कोणत्याही सवयी न बदलता फक्त त्यामध्ये दररोज एक चमचा फणसाच्या पीठाचा समावेश केल्यास याचा मोठा फायदा होईल अशी माहिती जेम्स जोसेफ यांनी दिली. जानेवारी महिन्यात झालेल्या Start-Up India Conference Prarambh मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्याच्या घडीला Jackfruit365 हे #1 सर्वाधिक विक्री होणाऱ्या पीठांमध्ये अॅमेझॉनच्या यादीत अग्रस्थानी असून, त्यानं गव्हाच्या पीठालाही मागे टाकलं आहे असंही ते म्हणाले.