लठ्ठपणाकडे दुर्लक्ष नको!

लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लठ्ठपणा हाही एक आजार असून जागरूकतेच्या अभावामुळे त्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते.  वेळीच लक्ष दिले तर या लठ्ठपणापासून दूर राहता येऊ  शकते. यासाठी लठ्ठपणा म्हणजे नेमके काय आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती असणे गरजेचे आहे.

शरीराच्या गरजेपेक्षा जास्त उष्मांक (कॅलरीज) जेव्हा सेवन करण्यात येते, तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते. सुरुवातीला चरबीच्या पेशी आकाराने वाढतात. जेव्हा आकाराची मर्यादा संपते, त्यानंतर दुसऱ्या पेशी तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे चरबीच्या पेशी वाढत जातात आणि स्थूलपणा येतो. सामान्य वजनापेक्षा शारीरिक वजन अतिरिक्त वाढते, तेव्हा व्यक्ती लठ्ठ आहे असे म्हटले जाते.

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) : एखादी व्यक्ती स्थूल आहे हे नक्की कधी म्हणता येईल यासाठी वैद्यकीय भाषेत त्याबाबत नमूद करण्यात आले आहे. आपले वजन किलोमध्ये उंचीच्या आकडय़ांनी भागाकार केल्यास येणारा आकडा हा आपले बीएमआय दर्शवितो. हे लठ्ठपणा मोजण्याचे सर्वात सोपे एकक आहे.

लठ्ठपणा हा एक अतिशय जटिल आजार आहे आणि त्यामध्ये अनेक घटक आहेत. जसे की, शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते, ती उष्मांकापासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा उष्मांक घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात आणि लठ्ठपणास सुरुवात होते. आनुवांशिकता हे लठ्ठपणामागील प्रमुख कारण आहे. याशिवाय हार्मोनल बदल, पर्यावरण, आहार आणि बदलती जीवनशैलीही लठ्ठपणास कारणीभूत ठरू लागली आहे. वातावरणातील बदलांमुळे आहारातही गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. यामुळेही लठ्ठपणाचे प्रमाण वाढतेय. याशिवाय आपल्या रोजच्या जेवणातील घटकही लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात. प्रथिने कमी प्रमाणात सेवन आणि काबरेहायड्रेट पदार्थाचे जास्त सेवन हे आणखी एक कारण आहे. अलिकडच्या काही महिन्यांत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे वजन वाढण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ  झाली आहे.

विशेषत: लठ्ठपणाकडे लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.  मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारी, पित्ताशयाच्या पिशवीत खडे होणे, मूत्रपिंडाचे विकार, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, पक्षाघात (स्ट्रोक) हे त्रास उद्भवण्याची शक्यता लठ्ठपणामुळे वाढते. अतिवजनामुळे श्वास घेण्यावरही परिणाम होतो. काही लठ्ठ व्यक्तींना झोपेत एकदम श्वास बंद होण्याची आणि श्वास अडकल्यामुळे दचकून जाग येण्याची तक्रार (स्लीप अप्निया) असते.  महिलांमध्ये लठ्ठपणामुळे अनियमित मासिक पाळी, वंधत्वाची समस्या उद्भवू शकते.  याशिवाय महिलांना स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग होऊ  शकतो, तर पुरुषांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका संभवू शकतो. सांगायचे तात्पर्य म्हणजे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण भारतातील पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे.

लठ्ठपणामुळे होणारे विकार टाळण्यासाठी सर्वात आधी वजन वाढणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी बदलत्या जीवनशैलीनुसार आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. लठ्ठपणा दूर करण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. काबरेहायड्रेट आणि साखरचे प्रमाण आहारात कमी असावे. तेलकट, मसालेदार व उघडय़ावरील पदार्थाचे सेवन करणे शक्यतो टाळावेत. चरबीयुक्त पदार्थ सेवन करू नयेत. लठ्ठपणा रोखण्यासाठी नियमित व्यायाम करणे अतिशय फायदेशीर आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रौढांसाठी दर आठवडय़ात किमान १५० मिनिटांच्या मध्यम ते जोरदार व्यायामाची शिफारस केली जाते. परंतु, प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक तंदुरुस्तीनुसार हे प्रमाण बदलू शकते. बऱ्याचदा व्यस्त जीवनशैलीमुळे नियमित व्यायाम करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत पायऱ्या चढणे आणि पायी चालणे हा व्यायाम अतिशय योग्य आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशभरात सध्या करोना विषाणूमुळे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच करोना या आजाराचा सर्वाधिक धोका लठ्ठ व्यक्तींना असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या लठ्ठ व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

– डॉ. अर्पणा गोविल भास्कर, à¤¬à¥…रिअ‍ॅटिक अ‍ॅण्ड लेप्रोस्कोपिक सर्जन

Comments : 0


    No Comments

Leave a comment