नवी दिल्ली : आजच्या आणि आधुनिक युगात सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दरवर्षी 30 जून हा जागतिक ‘सोशल मीडिया डे’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक सोशल मीडिया दिनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे जगातील संवादाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून सोशल मीडिया कसा उदयास आला याची प्रत्येकाला माहिती करून देणे.
अलिकडच्या काळात सर्वांच्याच आयुष्यात सोशल मीडियाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅट यांवरचे मेसेजेस पाहत होते. या आभासी विश्वाचे खऱ्या आयुष्यावर मोठे परिणाम होत आहेत. म्हणूनच ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’च्या निमित्ताने सोशल मीडियाच्या चांगल्या आणि वाईट बाजूंवरही चर्चा होत आहे.
अलिकडच्या काळात, सोशल मीडिया हे जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून उदयास आले आहे. सोशल मीडियाचा वापर करत आपण हजारो मैलांच्या अंतरावर अबसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण जगाशी कनेक्ट होता येतं. त्याचबरोबर सोशल मीडियावर देशातील तसेच जगभराती महत्वाच्या घडामोडी, बातम्या सर्वात जलद गतीने शेअर केल्या जातात. आजच्या काळात सोशल मीडिया गेम चेंजर बनला आहे. त्याचवेळी कोरोन काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म महामारीमुळे निराश झालेल्या लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन बनलं आहे.
‘सोशल मीडिया डे’चा इतिहास
जगभरात पहिल्यांदा 30 जून 2010 ला ‘जागतिक सोशल मीडिया डे’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी जगभरातील सोशल मीडियाचा प्रभाव आणि वैश्विक स्तरावरील सोशल मीडियाचा वापर यासंदर्भातील भूमिकेवर जोर देण्यासाठी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा करण्यात आला होता. जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिक्सडिग्री 1997 मध्ये लाँच झाला होता. याची स्थापना अँड्र्यू वेनरिच यांनी केली होती. दरम्यान 2001 मध्ये दहा लाखाहून अधिक यूजर्स झाल्यानंतर याला बंद केले गेले.
आजच्या वेगवान बदलत्या काळात सोशल मीडियाची माध्यमंही बदलत आहेत. तर ही बदलती माध्यमं त्याच वेगाने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. सध्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या माध्यमांचा कोट्यवधी युजर्स वापर करतात. तर काहीवेळा चुकीची माहिती देखील या माध्यमांद्वारे पसरवली जाते.