मुंबई : भारतात आजपासून बरोबर 27 वर्षांपूर्वी पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती. डॉ. पी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात एम्सच्या 20 सर्जननी हे हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं आणि रेकॉर्ड ब्रेक वेळेत ही सगळी प्रक्रिया पार पडली होती. या विषयची माहिती आपण जाणून घेऊया...
सन 1994 पूर्वी भारतीय नागरिकांना हृदय प्रत्यारोपणासाठी परदेशात जावे लागायचं, जे फक्त श्रीमंतांनाच परवडणारे होते. यामुळे हृदयाचा त्रास असलेल्या अनेक रुग्णांसाठी किंवा ज्यांचा हृदयाचा रोग अंतिम टप्प्यात होता त्यांच्यासाठी हे सारं काही महागडं होतं, उपचार करणं परवडणारे नव्हते.
पण जुलै 1994 मध्ये मानवी अवयव कायदा कायदा झाल्यानंतर, भारताचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ पी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय डॉक्टरांच्या चमूने भारताचे पहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी केले. ही मोठी उपलब्धी त्याचवर्षी 3 ऑगस्ट रोजी साध्य झाली.
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये किमान वीस शल्यचिकित्सकांच्या चमूने काम केले. विशेष म्हणजे यासाठीचा कायदा 7 जुलै 1994 रोजी अंमलात आला आणि एकाच महिन्यात हृदय प्रत्यारोपणाची उपलब्धी झाली. या कायद्यामध्ये मानवी अवयव काढणे, साठवणे आणि प्रत्यारोपण अशा काही तरतुदी आहेत.
रेकॉर्ड वेळेत प्रत्यारोपण कसे केले?हा कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरु असताना, एम्सच्या कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरी विभागाची वेणुगोपाल आणि त्यांची संपूर्ण टीम हृदय प्रत्यारोपणाच्या तंत्रावर काम करत होती. त्यासाठी त्यांनी प्राण्यांवरही प्रयोग केले आणि अहवालांच्या माहितीनुसार या प्रत्यारोपणाला त्यांना 59 मिनीटे लागली.
कोणाच्या ह्रदयाचे प्रत्यारोपण झाले?40 वर्षीय देवीराम असे या रुग्णाचे नाव होते. देवीराम हे अवजड उद्योग कर्मचारी होते, त्यांना कार्डिओमायोपॅथीचा त्रास होता. प्रत्यारोपणाच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचा रक्तगट AB पॉझिटिव्ह होता जो सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्तगट आहे.
प्रत्यारोपणा नंतर देवीराम 15 वर्षांपेक्षा जास्त जगलेज्यावेळी देवीराम यांची तब्येत खालावली होती त्याचवेळी ब्रेन हॅमरेजमुळे मरण पावलेल्या 35 वर्षीय महिलेला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. या महिलेच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर आणि देवीराम यांच्याकडेही पर्याय नसल्याने, हृदय प्रत्यारोपण यावर सहमती झाली. यानंतर, देवी राम आणखी 15 वर्षे आयुष्य जगले. त्यानंतर त्यांचाही ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. पण त्याचा हृदय प्रत्यारोपणाशी काहीही संबंध नव्हता अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
परदेशातही हे उपलब्ध नव्हतेत्या वेळी, डॉ. पी. वेणुगोपाल म्हणाले, "सर्व भारतीय शल्यचिकित्सकांनी या प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीसह तयार असणं महत्वाचं आहे. त्या दिवसांत रुग्णांना हृदय प्रत्यारोपणासाठी देशाबाहेर जावे लागत असे. त्या काळात परदेशातही हृदय प्रत्यारोपणासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेकदा अशा प्रकरणांमध्ये रुग्णांना निराशेला सामोरे जावे लागते.
गेल्या काही वर्षात भारताची प्रगती1994 साली झालेल्या या शस्त्रक्रियेने भारताला जगातील अशा देशांपैकी एक बनवले जेथे हृदय प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध होत्या. तेव्हापासून देशात यशस्वी हृदय प्रत्यारोपणही होऊ लागले. डॉ.वेणुगोपाल यांनी एकूण 25 प्रत्यारोपण केले. त्यांना 1998 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेल्या काही वर्षांमध्ये, खाजगी क्षेत्रात या दिशेने वेगवान प्रगती झाली आहे. आज भारतात हृदय प्रत्यारोपणाची किंमत अंदाजे 20 ते 25 लाखांपर्यंत आहे.
जगातील पहिले प्रत्यारोपणजगातील पहिले हृदय प्रत्यारोपण 3 डिसेंबर 1967 साली दक्षिण आफ्रिकेत केप टाऊनमध्ये सर्जन डॉ.ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केलं होतं. त्यावेळी डॉ. ख्रिश्चन यांच्या टीममध्ये 30 सदस्य होते आणि प्रत्यारोपणाला 9 तास लागले होते. ज्यांच्यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्या लुई वाशकांस्कीचा ऑपरेशननंतर 18 दिवसांनी निमोनियामुळे मृत्यू झाला.