आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. या दिवसाचं महत्व काय?, दिव्यांची पूजा कशी करावी?, या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं? आणि यंदा तिथीनुसार अमावस्येचा कालावधी कोणता आहे यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात…
दीप अमवास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणाही करतात. या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवैद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते. या दिवशी झाडं लावून ग्रह दोष शांत होतो असंही सांगितलं जातं. या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं. या दिवशी गंगास्थान आणि देणगी देण्यालाही फार महत्व असतं. या दिवशी माशांना पीठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात.
या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करुन सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करुन ही दीप पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते.
अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहीत दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.
पंचांगानुसार, या वर्षी अमावस्या तिथी शनिवार, ७ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल. जी ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून २० मिनिटापर्यंत राहील.