५० ते ८० हजार रुपयापर्यंतचे पॅकेज
नागपूर : जिल्ह्य़ातील करोनाचा उद्रेक बघता आजही अनेक अत्यवस्थ करोनाग्रस्तांना खासगी रुग्णालयांसोबतच शासकीय रुग्णालयांतही खाटा मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे काही कोविड रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर फावल्या वेळेत या रुग्णावर उपचार करून त्याबदल्यात ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्य़ात १ मे २०२१ रोजी करोनाचे ७५ हजार ६०८ उपचाराधीन रुग्ण होते. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार ८६२ रुग्णांवर विविध शासकीय व खासगी कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ६६ हजार ७४६ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. खाटा मिळत नसल्याने अनेक रुग्ण जीव मुठीत घेऊन घरातच उपचार घेत आहेत. असे रुग्ण या डॉक्टरांच्या उत्पन्नाचे मोठे साधन ठरले आहेत. डॉक्टर रोज संबंधित रुग्णाकडे दिवसातून एक किंवा दोन वेळा भेट देतात, आवश्यक इंजेक्शन व औषध देतात. तज्ज्ञ डॉक्टरांकडून घरीच उपचार होत असल्याने रुग्ण बरे होत असल्याचे खुद्द त्यांचे नातेवाईकच सांगत आहेत. जास्तच प्रकृती खालावलेल्या काहींचा मात्र औषधांना प्रतिसाद न दिल्याने मृत्यूही होतो. दरम्यान, या पद्धतीने जिल्ह्य़ात रुग्णांवर उपचार होत असतानाच त्याची प्रशासनाकडे नोंद नाही. त्यामुळे या पद्धतीने उपचार करणाऱ्यांची नोंद प्रशासन कधी करणार? व त्यांच्या उपचाराच्या नियोजनावर कसे लक्ष देणार? हा एक मोठा प्रश्न आहे.
माझ्या जवळच्याएका अत्यवस्थ नातेवाईकाला गेल्या आठवडय़ात रुग्णालयात खाट मिळाली नाही. एकाने सध्या एका कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरचा क्रमांक दिला. त्या डॉक्टरच्या मदतीने रुग्णावर घरीच उपचार सुरू केला. रुग्णाची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे.