वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांसाठी वन खात्याचे प्रस्ताव

वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रातून जाणारे रस्ते आणि त्यामुळे होणारे वन्यप्राण्यांचे अपघात यावर विविध संस्थांच्या सहकार्यातून खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात येतात. आता राज्याच्या वन खात्यानेच वन्यजीवांचा अधिवास असणाऱ्या क्षेत्रातून जाणारे रस्ते दुरुस्त करण्यासाठी किं वा नवीन रस्ते तयार करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याकरिता एक परिपत्रक काढले आहे.

वन संरक्षण अधिनियम १९८० अंतर्गत नवीन रस्त्यांच्या बांधकामांसाठी आणि चारपदरी व सहापदरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रस्ताव वन खात्याकडे येत आहेत. मात्र, हे काम करताना वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी काही सूचना राज्याच्या वन खात्याने दिल्या आहेत. जंगलाच्या सभोवताल पायाभूत सुविधा पुरवताना वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग कमीत कमी प्रभावित व्हावेत. गरज भासल्यास वन्यजीव उपशमन योजनेबाबत माहिती देण्यासाठी तसेच आवश्यक अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे आणि त्याचा अहवाल आल्यानंतरच मग पुढची कारवाई व्हावी. संरक्षित क्षेत्राबाहेरील जंगलातून जाणाऱ्या विद्यमान रस्त्यांबाबत, व्याघप्रकल्प, वन्यजीव कॉरिडॉर आणि वन्यजीवांचा अधिवास असणारे क्षेत्र या ठिकाणाहून नवीन रस्ते तयार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवताना उपाययोजना लक्षात घ्याव्यात. यात भुयारी मार्ग कमीत कमी चार मीटर रुंदी आणि तीन मीटर उंचीचे असावेत. अशा भुयारी मार्गादरम्यान मध्यंतर हा दोन किलोमीटरपेक्षा अधिक नसावा. त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तसेच परिणाम आणि तथ्य नोंदवल्यावर काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये भुयारी मार्गात बदल करता येतात किं वा अभियांत्रिकी मानके  आणि भूप्रदेश घटकानुसार तयात तांत्रिक बदल करता येतात. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले, ओढे आडवे येतात त्या ठिकाणी नवीन भुयारी मार्ग तयार करण्याची गरज नाही. तसेच नैसर्गिक नाले, ओढे असणाऱ्या ठिकाणी अभियांत्रिकी आवश्यकतेनुसार त्याची पुनर्रचना करता येईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Comments : 0


    No Comments

Leave a comment