करोनानं संपूर्ण जनजीवन ग्रासलेलं असताना या संकटकाळातही काहीजण माणुसकीला काळीमा फासणारे आणि लोकांचे जीव धोक्यात येतील, अशी कृत्य करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्येही असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. पूर्वी फळ विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने करोना काळात स्वतःला डॉक्टर असल्याचं दाखवत रुग्णालय सुरू केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
चंदन नरेश चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो नागपूरमधील कामठी भागातील रहिवाशी आहे. चौधरी पूर्वी फळं, आईस्क्रीम आणि ज्युस विक्रीचा व्यवसाय करायचा. हा व्यवसाय सोडल्यानंतर त्याने इलेक्ट्रिशियन म्हणून काम सुरू केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी चौधरीने ईलेक्ट्रिशियनचं काम करण्याबरोबरच दुसरीकडे सेवाभावी रुग्णालय देखील सुरू केलं होतं. मागील पाच वर्षांपासून तो नारायण मल्टीपर्पज सोसायटी या नावानं हा दवाखाना चालवत होता. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर स्वतः डॉक्टर असल्याचं भासवून आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सगळीकडे रुग्ण वाढू लागले. आरोपीनं या महामारीचा गैरफायदा घेतला. बोगस डॉक्टर असलेल्या चंदन नरेश चौधरीने कोविड रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने जिल्हा पोलिसांकडे सुरू असलेल्या या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दवाखान्यावर कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच पोलिसांनी दवाखान्यातून ऑक्सिजन सिलिंडरसह इतर वैद्यकीय साहित्य जप्त केलं.