महाज्योतीच्या जेईई नीट ऑनलाईन प्रशिक्षणाचा खेळखंडोबा
नागपूर : महाज्योतीने इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जेईई नीटचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू के ला. त्यासाठी दोन हजार नऊशे अर्ज मंजूर के ले, परंतु गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप नसल्याने प्रत्यक्षात शंभर देखील विद्यार्थी प्रशिक्षणाला उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे.
महाज्योतीने जेईईचे ऑनलाईन लाईव्ह प्रशिक्षण १७ मे २०२१ पासून सुरू के ले आहे. परंतु त्यात विद्यार्थ्यांची फारसी उपस्थिती राहत नसल्याचे समोर आले आहे. महाज्योतीने ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महागडी शिकवणी परडत नाही. म्हणून हा उपक्रम सुरू के ला. महाज्योतीच्या १९ ऑक्टोबर २०२१ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांसाठी १० हजार टॅब खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. राज्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले, परंतु प्रत्यक्षात अर्ज तीन हजार आले. त्यापैकी दोन हजार नऊशे अर्ज मंजूर करण्यात आले.
महाज्योतीने प्रत्येकी सुमारे १२ हजार किंमतीचे १० हजार टॅब, असे १२ कोटींचे टॅब विकत घ्यावेत. ते टॅब, जे विद्यार्थी ज्या महाविद्यालयात अकरावीला आहेत त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात यावेत. प्राचार्य हे विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर सुस्थितीत हे टॅब परत घ्यावेत. या काळातील इंटरनेटचा खर्च सुद्धा महाज्योतीने द्यावा. पुन्हा पुढच्या वर्षी नवीन विद्यर्थ्यांना हे टॅब वापरण्यास देता येईल, अशी ती योजना संचालक मंडळाने मंजूर केली होती. परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेकडे, महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. टॅब घेण्याची कार्यवाही केलीच नाही. तसेच याबाबत कुठलीही माहिती संचालकांच्या सभेत किंवा संचालकांना दिली नाही. त्यासंदर्भात टीका झाल्यानंतर पूर्व सूचना न देता घाईघाईने ऑनलाईन वर्ग सुरू केले. पण सध्याचा करोना काळ लक्षात घेता आणि विशेषता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक कुवत लक्षात घेता महाज्योतीने त्यांची निवड केली तरी मोबाईलअभावी या प्रशिक्षणाचा लाभ घेणे या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही, असे संचालक मंडळाच्या सदस्यांचे म्हणणे आहे.