स्वबळावर करोनाशी लढा; देशपातळीवर चर्चा
नागपूर : ७६८ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या नागपूर जिल्ह्यात फक्त कडोली (ता.कामठी) आणि खुर्सापार (ता. काटोल) या दोन ग्रामपंचायतींनी सरकारवर अवलंबून न राहतात आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून करोना महामारीवर मात केली. याचे कौतुक देश व राज्यपातळीवर होत आहे.
करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सरकारी आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. शहरात जेथे सरकारी आणि खासगी अशी अनेक मोठी इस्पितळे होती तेथे खाटांची मारामार असताना ग्रामीण भागात अनेक गावांमिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. अशा आणीबाणीच्या स्थितीत केवळ सरकारच्या भरोशावर न राहता कडोली आणि खुर्सापार या दोन ग्रामपंचायतींनी स्वबळावर करोनाचा सामना केला. विशेष म्हणजे, कडोलीच्या सरपंच प्रांजल वाघ आणि खुर्सापारचे सपरंच सुधीर गोतमारे हे युवा सरपंच आहेत. त्यांनी शासनाचे करोनासंदर्भातील दिशानिर्देश फाईल्समध्ये बंद करून न ठेवता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. लोकसहभागातून आरोग्य सुविधा निर्माण केल्या. खुर्सापार गावात पहिल्या लाटेत एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही तर दुसऱ्या लाटेत फक्त दोन लक्षणे नसलेले बाधित सापडले. कडोली गावातही पहिली लाट निष्प्रभ ठरली. दुसऱ्या लाटेत एक मृत्यू झाल्यावर ग्रामपंचायतीने स्वबळावर उपाययोजना केल्या.
दोन्ही गावात सध्या लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्के आहे. कडोली ग्रामपंचायतीचे केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाने तर खुर्सापार ग्रामपंचायतीचा समावेश केंद्र सरकारने देशभरातील ‘कोविड फायटर’ गावांच्या यादीत केला. त्यामुळे ही दोन्ही गावे सध्या राज्य आणि देशपातळीवर चर्चेत आली आहे.
कडोलीत लोकवर्गणीतून विलगीकरणाची सोय
कडोली ग्रामपंचायतीने ७० हजार रुपये लोकवर्गणी करून गावातीलच शाळेत दहा खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू केले. स्वखर्चाने प्राणवायू सिलेंडरची व्यवस्था केली आणि गावातील करोनाबाधितांची गावातच उपचाराची व्यवस्था केली. दुसरीकडे साथ पसरू नये म्हणून लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि करोना नियमनाचे सक्तीने पालन सुरू केले. नकारात्मक संदेश टाकण्यावर बंदी आणली. गावात सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नियमावली तयार केली. या गावाची चर्चा होत असून केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने गावाने केलेल्या कामाचे कौतुक केले.
खुर्सापारमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग
खुर्सापार ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर गोतमारे उच्चशिक्षित (एमबीए) आहेत. त्यांनी करोनाला रोखण्यासाठी एक वर्षापासून सातत्यपूर्ण प्रयत्न केले. गावातील उच्चशिक्षित तरुणांना करोना योद्धा म्हणून नियुक्त केले. गृहरक्षक दलाच्या माजी जवानांना पुन्हा पोशाख देऊन गावात बाहेरून येणाऱ्यावर नजर ठेवली. दानदात्यांकडून रोख रक्कम न घेता वस्तू स्वरूपात मदत घेतली. कोणी सीसीटीव्ही लावून दिले. त्यामुळे गावात नियम मोडणाऱ्यावर टांच आली. कोणी सॅनिटायझरच्या मशीन दिल्या, त्या गावात ठिकठिकाणी व शासकीय कार्यालयात लावल्या. शिक्षकांवर मुले व त्यांच्या पालकांची, अंगणवाडी सेविकांवर तेथील मुलांची व त्यांच्या पालकांची तर कृषी आणि महसूल कर्मचाऱ्यावर शेतकऱ्याना कोविडबाबत माहिती देण्याची जबाबदारी टाकली. लोकांना विश्वासात घेऊन जनजागृती केली.
‘‘ करोनाच्या साथीपासून गावाचे संरक्षण करणे हेच एकमेव ध्येय होते. गावकऱ्याना सोबत घेऊन उपाययोजना केल्या. गावातून बाहेर जाणारे व बाहेरून गावात येणाऱ्याची नियमित तपासणी करण्यात आली. सॅनिटायझर, मुखपट्ट्या व सुरक्षित अंतर राखण्याबाबत जनजागृती के ली. विलगीकरणाची सोय झाल्याने गावातच उपचार शक्य झाले. लोकांनीही साथ दिली.’’ – प्रांजल वाघ, सरपंच, कडोली
‘‘करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आलेले सरकारी निर्देश फाईल्समध्ये बंद करून न ठेवता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली. लोकांना समजेल अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगितले व त्यांच्याच सहकार्याने नवनवीन उपक्रम राबवले. त्याला यश आले.’’ – सुधीर गोतमारे, सरपंच, खुर्सापार