नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही खाजगी रुग्णालय सुरू करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मीनगर झोनच्या
वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहोकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिले. महाराष्ट्र प्रशासकीय सेवा कायदा १९७९ मधील (शिस्त व अपील) दहाव्या क्रमांकाच्या नियमाअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. मोहोकर या स्त्रीरोगतज्ज्ञ व लक्ष्मीनगर झोनच्या वैद्यकीय अधिकारी होत्या. कारवाईसंदर्भातील आदेशानुसार डॉ. मोहोकर यांना महापालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य विभागात (वैद्यकीय) नियमितपणे उपस्थित राहण्याबाबत सांगितले असून त्यांना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची खासगी किंवा निमशासकीय सेवा तसेच खासगी व्यवसाय या कालावधीत करता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेकडून दीड लाख रुपये महिना वेतन घेत असतानाही डॉ. मोहोकर या स्वत:चे खासगी रुग्णालय चालवत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक मदन सुभेदार यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे.